बेवारस वाहनांनी केले सुंदर ठाण्याला विद्रूप!

ठामपा आणि वाहतूक शाखेची टोलवा-टोलवी

ठाणे: स्वच्छ आणि सुंदर ठाणे शहराच्या निर्मितीसाठी कोट्यवधी रुपये खर्च होत असताना शहरातील रस्त्यावर सुमारे दीड हजार बेवारस वाहने धूळ खात पडत असून शहराच्या सौंदर्याला डाग लावत आहेत. दरम्यान ठाणे महापालिका आणि पोलीस वाहतूक शाखा यांच्यात टोलवा-टोलवी पाहायला मिळत आहे.

उद्यापासून ठाणे पोलीस वाहतूक विभाग सुरक्षा सप्ताह साजरा करणार आहे. शहरातील वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरील बेकायदा पार्किंग तसेच अनेक महिने धूळ खात पडून असलेली बेवारस वाहने हे मोठे आव्हान ठाणे पोलिसांसमोर आहे. शहरातील रस्ते अरुंद आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडी होत असतानाच रस्त्यावर बेवारस असलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत असते. ठाणे महापालिका प्रशासनाने मागिल वर्षी रस्त्यावर असलेल्या बेकायदेशीर वाहनांच्या विरोधात कारवाई केली होती, परंतु मागिल काही महिन्यांपासून ही कारवाई थंडावली आहे. शास्त्री नगर, इंदिरा नगर, सुभाष नगर, कळवा, मुंब्रा, मनोरमा नगर, राबोडी या भागातील रस्त्यावर तसेच शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर देखील बेवारस वाहने अनेक महिन्यांपासून धुळखात उभी आहेत. यात रिक्षांसह, चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा समावेश आहे. या वाहनांविरुद्ध कारवाई करून रस्ते मोकळे करावेत, अशी मागणी जागरूक ठाणेकर करत आहेत.

राज्य सरकारने शंभर दिवसांचा कृती आराखडा प्रत्येक महापालिकेला दिला आहे. त्यात शहर स्वच्छ ठेवण्याचा मुद्दा समाविष्ट असल्याने ठाणे महापालिका प्रशासनाने बेवारस वाहनांच्या विरोधात युद्ध पातळीवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

याबाबत वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाठ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि बेवारस वाहने उचलण्याची जबाबदारी ठाणे महापालिकेची आहे, परंतु त्यांच्याकडे गाड्या ठेवण्यासाठी जागा नाही, त्यामुळेच या गाड्या रस्त्यावर उभ्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याबाबत ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि जागेची अडचण आहे. लवकरच महापालिका आयुक्त सौरभ राव ती अडचण दूर करणार असून बेवारस गाड्यांच्या विरोधात कारवाई सुरु केली जाणार आहे. या गाड्या सुरक्षित ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे. जागा मिळताच बेवारस गाड्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रशासनाची मानसिकता नाही-बल्लाळ

प्रवासी महासंघाचे अध्यक्ष मिलिंद बल्लाळ यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, या गाड्यांच्या विरोधात कारवाई करण्याची प्रशासनाची मानसिकता नाही. त्यामुळे ते कारणे सांगतात. रस्त्यावर गाड्या उभ्या करणाऱ्यांना नोटीस देऊन त्यांच्या गाड्या जप्त का केल्या जात नाहीत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.