ठाणे: पैठणी कशी विणली जाते, याचे कुतूहल प्रत्येकाला असते. हा अनुभव प्रत्यक्ष मिळावा, यासाठी ठाण्यातील गोखले रोड येथे असलेल्या कलामंदीर या साडी विक्रीच्या दुकानात पैठणीचे माहेरघर असलेले येवले येथील साडी विणणारे कारागीर आणि पारंपरिक ‘हातमाग’ उपलब्ध केले असून त्यावर पैठणी कशी विणली जाते याचे प्रात्यक्षिक ठाणेकरांना दाखवले आहे.
कलामंदीर या दुकानाच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला जातो. यंदा कलामंदीरने विणकरांच्या मेहनतीचा प्रत्यक्ष अनुभव ठाणेकरांना देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रथमच ठाणे शहरात येवल्याचे साडी विणणारे कारागीर आणि पारंपरिक ‘हातमाग’ सादर केले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन मंगळवार १४ जानेवारी रोजी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या पत्नी डॉ. अर्चना माळवी यांच्या हस्ते कलामंदीरच्या भव्य दालनात झाले. हा उपक्रम १४ जानेवारीपासून ३१ जानेवारीपर्यंत असणार आहे. कारागीरांच्या कौशल्याने तयार होणाऱ्या सहावारी रेश्मी पैठणीचा प्रवास ठाणेकरांना प्रत्यक्ष पहायला मिळावा यासाठी कलामंदिरने हा उपक्रम केला आहे.
पैठणी हा पूर्वी शाही वस्त्रप्रकार मानला जात असे, परंतु आता सण-उत्सवांमध्ये सर्वत्र त्याचा उपयोग होतो. युवा पिढीही आता विणकाम शिकत आहे. ही एक कौतुकास्पद बाब आहे. ही कला जिवंत राहिली पाहिजे आणि यामध्ये नव्या पिढीनेही योगदान द्यायला हवे. हाताच्या कलेला चालना देण्यासाठी ठाणेकरांनी स्वतः पैठणी कशी विणली जाते, हे पाहण्यासाठी यावे, असे आवाहन कलामंदीरचे मालक अल्पेश छाडवा यांनी केले आहे. तर यावेळी एक साडी विणण्यासाठी तीन महिने लागतात. तसेच रेश्मी धाग्यांचा आणि नैसर्गिक रंगांचा वापर करून साडी विणली जाते. येवले कारखान्यात महिन्याला २५ ते ३० साड्यांचे विणकाम केले जाते, असे कारागीराने सांगितले.
प्रत्यक्ष पैठणी कशी विणली जाते, हे येथे आल्यावर पाहायला मिळाले. ठाणे शहरातील प्रत्येक गृहिणीने येथे येऊन हे विणकाम अनुभवावे. भारतीय वस्त्र परंपरेचा वारसा जपणाऱ्या कलामंदीरचा हा स्तुत्य उपक्रम आहे, असे डॉ. अर्चना माळवी यांनी सांगितले.