पाणीटंचाई घोडबंदरच्या पाचवीला; वाघबीळकर टँकरच्या दावणीला!

* खासदार नरेश म्हस्के यांनी अधिकाऱ्यांना खडसावले
* बैठकीत ४७ गृहसंकुलांच्या प्रतिनिधींचा संताप

ठाणे: लाखो-करोडो रुपयांच्या सदनिका विकत घेणाऱ्या घोडबंदरवासींना बिल्डर लॉबीने पाणी टँकर वाल्यांच्या दावणीला बांधले आहे. तर टँकर माफियांच्या फायद्यासाठी महापालिका पाणीटंचाई निर्माण करते का असा सवाल उपस्थित करत ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

घोडबंदररोडवरील वाघबीळ परिसरातील ४७ गृहसंकुलांमधील नागरिकांना भेडसावत असलेल्या मूलभूत सोyi-सुविधांबाबत खासदार नरेश म्हस्के यांना निवेदन सादर केले होते. या पार्श्वभूमीवर खासदार नरेश म्हस्के यांनी आज संबंधित नागरिक व महापालिका अधिकारी यांची एकत्रित भेट महापालिकेच्या कै. अरविंदे पेंडसे सभागृहात घेतली. यावेळी पाणीपुरवठा, फेरीवाले समस्या, मलनिस्सारण वाहिन्या, मैदानाची उपलब्धता, खुल्या असलेल्या विद्युतवाहिन्या, अर्धवट स्थितीत असलेले रस्ते आदी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश खासदार म्हस्के यांनी महापालिका प्रशासनास दिले.

वाघबीळ भागातील ४७ गृहनिर्माण गृहसंकुले पाणी टंचाईने त्रस्त आहेत. पाणीटंचाई निर्माण झाल्यावर लोकप्रतिनिधींनी फोन केल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत होतो, परंतु पुन्हा पाणीटंचाई निर्माण होते. पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर माफियांना पिण्याचे पाणी मुबलक कसे मिळते असा सवाल खा. श्री. म्हस्के यांनी उपस्थित करून पाणीटंचाई टँकर माफियांसाठी केली जाते का, असा प्रश्न उपस्थित करून या भागातील नागरिकांची पाणीटंचाईमधून सुटका करा, असे आदेश दिले.

खोदलेल्या रस्त्यांमुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना श्री.म्हस्के यांनी दिल्या. वाघबीळ परिसरात पदपथ अतिक्रमित झाले आहेत. रस्ते वाहतूकीसाठी खुले राहतील व फूटपाथही नागरिकांसाठी कायमस्वरुपी मोकळे ठेवावेत, अशा सूचना श्री. म्हस्के यांनी दिल्या. गृहसंकुलांना मुबलक पाणी नियमित मिळेल या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागास त्यांनी दिल्या. न्यायालयाच्या निर्णयानुसार मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करून द्यावीत, निर्देशही खासदारांनी यावेळी दिले. महावितरण कंपनीशी संपर्क करुन अस्ताव्यस्त पडलेल्या केबल्स सुस्थितीत व सुरक्षित कराव्यात अशाही सूचना देण्यात आल्या.

घनकचऱ्याची नियमित विल्हेवाट लावावी, रोज दोन वेळा रस्ते सफाई व्हावी याबाबत खबरदारी घेण्यात येईल तर येत्या काही दिवसात यांत्रिकी पध्दतीने घोडबंदररोडवरील रस्त्यांची सफाई केली जाणार असल्याचे उपायुक्त मनिष जोशी यांनी बैठकीत नमूद केले.

घोडबंदर रोडवर अवजड वाहनांच्या वाहतूकीसाठी वेळ निश्चित करुन इतर वेळेस गाड्या उभ्या करण्यासाठी ठाणे व वसई या ठिकाणी जागा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचेही खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी नमूद केले.

यावेळी माजी महापौर मिनाक्षी शिंदे, माजी स्थायी सभापती राम रेपाळे, शिवसेना विभागप्रमुख मुकेश ठोंबरे तर प्रशासनाच्यावतीने अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, नगरअभियंता प्रशांत सोनग्रा, उपायुक्त जी.जी गोदेपुरे, मनिष जोशी, दिनेश तायडे, मुख्य लेखा वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी, सहाय्यक आयुक्त बेला सुर्वे, उपनगरअभियंता विकास ढोले, कार्यकारी अभियंता संजय कदम, उपअभियंता अतुल कुलकर्णी व गृहसंकुलातील प्रतिनिधी उपस्थित होते.