भाईंदर पश्चिमेकडील धोकादायक एसटी कार्यालयावर हातोडा

भाईंदर: भाईंदर पश्चिमेकडील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एस. टी. डेपोच्या कार्यालयाची दुरावस्था झाली असून अनेक ठिकाणी सिलींगचे प्लास्टर कोसळले आहे. मात्र धोकादायक अवस्थेतील कार्यालयात जीव मुठीत घेऊन एसटी कर्मचारी आजही परिवहन सेवेचे कामकाज पार पाडीत आहेत. ही बातमी प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या तीन आठवड्यातच मिराभाईंदर महापालिका प्रभाग कार्यालय क्र. २ च्या अधिकाऱ्यांसह अतिक्रमण विभागाने धोकादायक कार्यालय जेसीबीच्या सहाय्याने जमिनदोस्त केले.

परिवहन मंत्रीपदी निवड होताच भाईंदर पश्चिमेकडील एसटी कार्यालयास भेट देऊन पाहणी केल्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या जागेवर विकासकामे महापालिका माध्यमातून सुरू करण्याची जाहीर घोषणा केली. त्यानंतर मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर महापालिका प्रभाग कार्यालय क्र. २ च्या प्रभाग अधिकाऱ्यांसह अतिक्रमण विभागाने धोकादायक एसटी कार्यालयासह पहिल्या मजल्यावर असलेल्या गुरु उपहारगृहावर जेसीबी चालवत बांधकाम जमिनदोस्त केले.

ही कारवाई मनपा आयुक्त संजय काटकर, अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, उपायुक्त कल्पिता पिंपळे यांच्या आदेशानुसार व अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण, सहायक आयुक्त लॉरेटा घाडगे यांच्यासह पालिका कर्मचारी, म.सु.ब जवान व पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.