ठाणे: ‘आरटीई’ अंतर्गत २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रियेत १४ जानेवारीपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आले आहे.
बालकांच्या पालकांना २७ जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार असून पालकांनी प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र असणाऱ्या जास्तीत जास्त बालकांच्या अर्जाची नोंदणी करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार(आरटीई) कायद्या अंतर्गत वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिले जातात. ठाणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व महानगर पालिका अंतर्गत एकूण ६२७ पात्र शाळा असून एकूण ११ हजार ३२० रिक्त जागा उपलब्ध आहेत.
‘आरटीई’ अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत बालकांच्या अर्ज नोंदणीसाठी महाराष्ट्र शासनाकडून https://student.maharashtra.gov.in/adm_Portal या वेबसाईटवर १४ जानेवारीपासून ते २७ जानेवारीपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पालकांसाठी मदत केंद्रांची यादी, ऑनलाईन प्रक्रियेत अर्ज नोंदणी बाबत मार्गदर्शक पुस्तिका, आवश्यक कागदपत्रे इत्यादी बाबत सर्व माहिती शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याची सर्व संबधितांनी नोंद घ्यावी, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी दिली आहे.