ठाणे : प्रतिसाद न देणा-या १९५० प्रकल्पांवर पहिल्या टप्प्यात प्रकल्प स्थगितीची कारवाई केली असून प्रतिसाद न देणा-या आणखी ३४९९ प्रकल्पांवरही होणार कठोर कारवाई होणार आहे.
महारेराने गेल्या महिन्यात दोषी प्रकल्पांना दिलेल्या नोटिसींना सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. आणि नोटीस दिलेल्या १०,७७३ प्रकल्पांपैकी ५३२४ प्रकल्पांनी अपेक्षित प्रतिसाद दिला आहे.
महारेराकडे गृहनिर्माण प्रकल्पाच्या नोंदणीच्या वेळी प्रकल्प पूर्ततेची दिलेली तारीख उलटून गेली आहे. तरीही कुठलीही माहिती अद्ययावत न देणा-या १०,७७३ प्रकल्पांना महारेराने कारणे दाखवा नोटिस बजावल्या होत्या. या प्रकल्पांना अपेक्षित माहिती अद्ययावत करण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. या नोटिसींना सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून ५३२४ प्रकल्पांनी यथोचित प्रतिसाद दिला आहे. यापैकी ३५१७ प्रकल्पांनी भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) सादर केले आहे.
५२४ प्रकल्पांनी प्रकल्पांच्या मुदतवाढीसाठी अर्ज केले आहेत आणि १२८३ प्रकल्पांच्या प्रतिसादांची छाननी सुरू आहे. १९५० प्रकल्पांवर प्रकल्प स्थगितीची कारवाई करण्यात येऊन त्यांचे बँक खाते गोठवण्यात आले आहे. प्रकल्पाशी संबंधित व्यवहारांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. याशिवाय काहीही प्रतिसाद न देणा-या आणखी ३४९९ प्रकल्पांवरील कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. महारेरा नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करताना प्रत्येक विकासकाला प्रकल्प प्रत्यक्षात कधी पूर्ण होणार याची तारीख आपल्या प्रस्तावात स्पष्टपणे नोंदवावी लागते.
महारेराच्या अनुपालन कक्षाने जेव्हा जानेवारी २०२३ मध्ये नोंदवलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला तेव्हा ७४८ प्रकल्पांपैकी फक्त तीन प्रकल्पांनी ही माहिती अद्ययावत केली होती. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर यात लक्षणीय सुधारणा होताना दिसते. व्यापगत प्रकल्पांच्या नोटीसींना मिळालेल्या प्रतिसादांतून हे स्पष्ट होते.