थकबाकीदारांच्या दारात ठामपाचे ढोल-ताशे

ठाणे: कर वसुलीसाठी ठाणे महापालिकेने अनोखी शक्कल लढवली असून करदात्यांच्या दारात चक्क ढोल वाजवून मालमत्ता कर भरणा करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाकडून केल्या जात आहेत.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनेक दुकानदारांची कराची रक्कम थकीत आहे. अशा करदात्यांना वारंवार नोटीसा देऊनही कर न भरल्यामुळे आता ठाणे महानगरपालिका प्रशासनाने संबंधित आस्थापनांसमोर ढोल वाजवून करवसुली सुरू केली आहे. ज्या आस्थापनांची किंवा दुकानदारांची दहा लाखांपेक्षा अधिक कर थकबाकी आहे, त्यांच्या दारात ढोल वाजवून त्यांना कर भरण्याचे आवाहन केले जात आहे. ही कारवाई गुरुवारपासून ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

मालमत्ता कर आणि पाणी बिल यातून येणारा महसुल हा महापालिकेच्या आर्थिक नियोजनाचा सगळ्यात महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे या दोन्हींच्या वसुलीची उद्दिष्टपूर्ती तातडीने व्हावी, असे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीत स्पष्ट केले.

मालमत्ता कराच्या वसुलीचे उद्दीष्ट ८५७ कोटी रुपये असून आतापर्यंत ५७६ कोटींची वसुली झाली आहे. तर, पाणी बिलांच्या थकबाकीसह चालू वर्षाच्या वसुलीचे लक्ष्य २२५ कोटी रुपये असून त्यापैकी ८० कोटींची वसुली झाली असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.