कल्याण-शिळ रोडवर एनएमएमटी जळुन खाक

चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील प्रवासी सुखरूप

डोंबिवली : नवी मुंबईकडून कल्याण दिशेकडे धावणाऱ्या नवी मुंबई महानगर पालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या एका बसला कल्याण-शिळ रोडवर आग लागल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. चालकाने प्रवाशांना बसमधून तत्काळ उतरल्याने जीवितहानी टळली. रस्त्यावरील एका टँकरवाल्याने ही आग विझविली.

एनएमएमटीची बस (क्र.एमएच-४३-एच-५४३०) लोढा पलावाकडून कल्याणच्या दिशेने जात होती. रूनवाल चौकाजवळ बसमधून अचानक धूर निघु लागल्याने चालक आणि वाहकाने प्रसंगावधान राखत तत्काळ बस बाजूला घेत प्रवाशांना खाली उतरवले. त्यानंतर या बसने पेट घेतला. दरम्यान आग मोठ्या प्रमाणात पसरली होती.

पालिकेच्या ड प्रभागक्षेत्र कार्यालयाच्या हद्दीतील अग्निशमक दल केंद्राला माहिती मिळाल्यानंतर तेथून पलावा अग्निशमक दल केंद्राला कळविण्यात आले. येथून एक अग्निशमक बंब घटनास्थळी निघाले. ज्या ठिकाणी घटना घडली तेथे जवळ एका टँकरवाल्याने पाईपच्या सहाय्याने आग विझवली. स्थानिक पोलीसही घटनास्थळी पोहचले, अशी माहिती पलावा अग्निशमक दल केंद्र प्रमुख सूरज यादव यांनी दिली.