नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाचे वाहन उडवले, नऊ जवान शहीद

छत्तीसगडमध्ये मोठा हल्ला

बिजापूर: छत्तीसगडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या वाहनावर हल्ला केला असून या हल्ल्यात नऊ जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी दुपारी अबुझमदच्या दक्षिण भागात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीनंतर परतणाऱ्या जवानांचे पिकअप वाहन नक्षलवाद्यांनी स्फोटकांनी उडवले. सुरक्षा दलाचे एक पथक घटनास्थळी पाठवण्यात आले आहे.

या हल्ल्यात आठ जिल्हा राखीव रक्षक जवान आणि एक चालक शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना बिजापूर जिल्ह्यातील कुत्रु भागात घडल्याचे सांगितले जात आहे. रविवारी चकमक झाल्यानंतर हे जवान नारायणपूरहून परतत होते.
बिजापूर जिल्ह्यातील कुत्रु-बेद्रे मार्गावरील आमेलीजवळ हा हल्ला झाला. रविवारी नारायणपूरमध्ये झालेल्या चकमकीनंतर जवान परतत होते. चार दिवस जंगलात फिरून सैनिक थकले होते. त्यामुळे ते पिकअप वाहनातून परतत होते.

स्फोटावेळी वाहनामध्ये २० जवान होते. घटनेच्या माहितीनंतर बीजापूरचे एसपी जितेंद्र यादव घटनास्थळी दाखल होण्यासाठी निघाले. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

या चकमकीत डीआरजीचे हेड कॉन्स्टेबल सन्नू करम शहीद झाले. ते आत्मसमर्पण केलेले नक्षलवादी होते. २०१७ मध्ये त्यांनी आत्मसमर्पण केले. २०१९ मध्ये ते जिल्हा राखीव रक्षकमध्ये रुजू झाले. यानंतर ते सतत अनेक चकमकींमध्ये सहभागी झाले.

याआधी झालेल्या चकमकीनंतर सोमवारी आणखी एका नक्षलवाद्याचा मृतदेह मिळाला आहे. आतापर्यंत पाच नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मारले गेलेले नक्षली दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचे असू शकतात.