ठाणे : पदोन्नती आणि प्रशासकिय बदल्यांसाठी वस्तु व सेवा कर (जीएसटी) विभागातील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी २० डिसेंबर रोजी ठाणे जीएसटी कार्यालयात दोन तास काम बंद आंदोलन केले.
महाराष्ट्र वस्तु व सेवा कर कर्मचारी संघटना, मुंबई या संघटनेच्या माध्यमातून गेले तीन दिवस महाराष्ट्रभर हे कामबंद आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत काम ठप्प झाल्याने ठाणे जीएसटी कार्यालयात शुकशुकाट पसरला होता. महाराष्ट्र वस्तु व सेवा कर विभागातील राज्य कर निरिक्षक ते राज्य कर अधिकाऱ्यांच्या पदोन्नती तसेच कर सहाय्यक व कर निरिक्षक यांच्या विनंती बदल्या आणि प्रशासकिय बदल्या रखडल्या आहेत. त्याचबरोबर वेतनवाढ, सेवाशर्तींमध्ये सुधारणा आणि शासकीय लाभांचा विस्तार या मागण्या प्रलंबित आहेत. वेळोवेळी या मागण्या मांडूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी या आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. या आंदोलनाद्वारे कर्मचाऱ्यांनी आपले प्रलंबित मागण्यांचे निवेदन सरकारकडे पोहोचवले. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.