२० ग्रामसेवकांना प्रत्येकी २५ हजाराचा ठोठावला दंड

मुरबाड : माहितीच्या अधिकारात अर्जदारास माहिती न दिल्या प्रकरणी राज्य माहिती आयोगाचे कोकण खंडपीठाने मुरबाड तालुक्यातील शिवळे माल्हेड, देवळे, सायले, सासणे, न्हावे, फणसोली, खानिवरे, करवेळे अशा सुमारे २० ग्रामसेवकांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या विविध योजना तसेच मुलभूत सुविधा ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी महत्वाचा घटक म्हणजे ग्रामसेवक, हा ग्रामविकासाचा कणा समजला जातो.त्यांनी आपल्या ग्रामपंचायत कारभारात किती सतर्कता आणि पारदर्शकता ठेवली आहे, याची माहिती अधिकारमध्ये माहिती घेण्यासाठी अनेक नागरिक अर्ज करतात. मुरबाड तालुक्यातील सुमारे २० ग्रामपंचायतीकडे ॲड. नितीन देशमुख यांनी माहिती मागितली असता ती माहिती देण्यात सर्वच ग्रामसेवकांनी उदासीनता दाखविल्याने देशमुख यांनी प्रथम आपिल दाखल केले. परंतु प्रथम अपिलात माहिती देण्याचे आदेश असताना ग्रामसेवकांनी त्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याने देशमुख यांनी राज्य माहिती आयोग कोकण खंडपीठाकडे अपिल दाखल केले. अपिलकाराची बाजु समजुन घेत आयोगाने ग्रामसेवकाकडून माहिती न दिल्याचा खुलासा मागवुन माहिती देण्यात कसुरी केल्यामुळे प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला असून ते त्यांछ वेतनातून कपात करण्याचे आदेश गटविकास अधिकारी पंचायत समिती मुरबाड यांना दिले आहेत.

आयोगाने दिलेल्या आदेशानुसार वसुली सुरू आहे. ग्रामसेवकांनी आपल्या कामात पारदर्शकता ठेवली नाही तर त्याची माहिती मागणे, तक्रारी करणे व आंदोलने, उपोषणे करणे आणि मग वरिष्ठांकडून होणाऱ्या चौकशीला सामोरे जावे लागते. हा मानसिक त्रास सहन करुन घेण्यापेक्षा आपल्या कामात पारदर्शकता ठेवावी, अशा सुचना दिल्याचे गटविकास अधिकारी लता गायकवाड यांनी सांगितले.