शहापूरात खैर पकडला; अंधारात आरोपी पळाले !

‘ठाणेवैभव’च्या वृत्तानंतर वनखाते सावध

शहापूर : दहिवली राउंडमधून खैर लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्या तस्करांच्या गाडीला पकडण्यात वन कर्मचाऱ्यांना यश आले आहे. मात्र आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले.

दहिवलीमधील कं.नं. 850 दहिवली कर्मचाऱ्यांचे आरोपीला पकडण्यासाठी पथक तयार करुन वनपाल वनरक्षक यांना ठराविक ठिकाणी दबा धरुन बसण्यासाठी सांगुन पहाटे सव्वा चारच्या सुमारास एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा पिकअप गाडी जंगलात जावून अवैधरित्या वृक्षतोड केलेल्या खैराचे नग भरत होती. या दरम्यान शासकीय गाडी रस्त्याचे मधोमध आडवी लावुन सदर पिकअपच्या दिशेने कर्मचारी चालुन गेले असता अंधाराचा फायदा घेऊन आरोपीने जंगलात धूम ठोकल्याचे सांगण्यात आले.

कर्मचाऱ्यांनी आरोपीचा पाठलाग केला पण जंगलात काळोख जास्त असल्याने आरोपी पळून गेले असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. तथापी गाडी व मुद्देमाल पकडण्यात पथकाला यश आले. याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले वाहन व मुद्येमाल काष्ठ विक्री आगार आसनगांव येथे जमा करणेत आला आला आहे. गुन्ह्याची कसून चौकशी चालु आहे. गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी पथक तयार करण्यात आले असल्याची माहिती वन परीक्षेत्र अधिकारी शैलेश गोसावी यांनी दिली.

‘ठाणेवैभव’ने खैर तस्करीला फोडली होती वाचा

दुर्मिळ वनसंपदा असल्याने त्याची तोड करण्यास अथवा विक्री करण्यास बंदी असलेल्या खैराची बेकायदेशीर तोड करून लाखो रुपयांचा सरकारी महसुल बुडवल्याची घटना शहापूर तालुक्यातील शहापूर वन क्षेत्रात घडली होती. याबाबत ‘ठाणेवैभव’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेत वन विभाग सक्रिय झाल्याचे या कारवाईनंतर दिसून आले. मोठ्या प्रमाणात झालेल्या या बेकायदा खैर तोड करणाऱ्या तस्करांना वन विभागाला सध्यातरी अपयश आल्याचे दिसून येत आहे. आरोपी फरार झाले असून वन अधिकाऱ्यांची आता खरी कसोटी लागणार आहे.