अधिवेशनात आमदार संजय केळकर यांची मागणी
ठाणे: ठाण्यातील सफाई कामगारांना घरे मिळवून देण्यात आमदार संजय केळकर यांना मागील कार्यकाळात यश मिळाले असताना आता अधिवेशनात त्यांनी पुन्हा एकदा सफाई कामगारांना सरसकट वारसा हक्काचा लाभ मिळवून देण्यासाठी आवाज उठवला आहे.
ठाणे महापालिकेच्या सेवेत असलेल्या सफाई कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेक कामगार वयोमानानुसार मृत्यू पावले आहेत. त्यांच्याजागी त्यांच्या वारसांना नोकरी मिळून कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आमदार संजय केळकर काही वर्षांपासून लढा देत आहेत. सध्या सुरू असलेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात त्यांनी पुन्हा एकदा सफाई कामगारांच्या वारसाहक्काचा प्रश्न उपस्थित करून शासन स्तरावर प्रयत्न करून न्याय देण्याची मागणी केली.
लाड-पागे समितीने मृत्यू पावलेल्या सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी देण्याची शिफारस राज्य सरकारकडे केली आहे. मात्र जातनिहाय विभागणीमुळे अनेक जाती वगळण्यात आल्याने सर्वच कामगारांना वारसाहक्काचा लाभ मिळत नसल्याची बाब आमदार केळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. ठाणे महापालिकेत पात्र सफाई कामगरांच्या मागण्या प्रलंबित असल्याचेही त्यांनी सांगितले.
जो-जो कामगार घाणीत काम करतो, सफाईचे काम करतो, त्या सर्व सफाई कामगारांना सरसकट वारसा हक्काचा लाभ मिळावा, अशी मागणी श्री.केळकर यांनी केली आहे. विशेष म्हणजे सद्यस्थितीत वारसा हक्काचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने या लाभापासून अनेक कामगार वंचित आहेत. शासन स्तरावर याबाबत राज्य सरकारने प्राधान्याने पाठपुरावा केल्यास सफाई कामगारांना वारसा हक्काचा लाभ मिळेल, अशी मागणी श्री केळकर यांनी अधिवेशनात केली.