कर्मचाऱ्यांना नाही पगार; औषधांचा आहे ठणठणाट

आपला दवाखाना होऊ लागला ‘ ‘परका’

ठाणे : सर्वसामान्य रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा देणाऱ्या आपला दवाखाना या संकल्पनेला आता सुरुंग लागल्याचे दिसत आहे. महापालिकेच्या माध्यमातून दरमहा कोट्यवधी रुपये घेणाऱ्या संबंधित कंपनीने गेल्या पाच महिन्यांपासून डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना पगारच दिला नसल्याचे उघडकीस आले आहे तर गरीब रुग्णांना औषधेही मिळेनाशी झाली आहेत. याबाबत नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचे कळते.

गोरगरिबांना मोफत वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी सुरू करण्यात आलेल्या आपला दवाखाना उपक्रमाची सध्या दयनीय अवस्था असून येथे काम करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांना मागील चार-पाच महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. येथे येणाऱ्या रुग्णांना औषधेही मिळत नाहीत तर मोफत पॅथोलॉजी सुविधा यापूर्वीच बंद झालेली आहे. परिणामी ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आदी भागातील झोपडपट्ट्यांमधील हजारो गरीब रुग्ण मोफत वैद्यकीय सेवेपासून वंचित राहत असल्याची भीती व्यक्त होत आहे.

ठाणे शहरात 40-42 ठिकाणी आपला दवाखाना सुरू करण्यात आले आहेत. हे दवाखाने चालवण्याचे कंत्राट कर्नाटकमधील मेडनेगो हेल्थ प्रा.लि. या कंपनीला देण्यात आला आहे. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून कंपनीला दरमहा कोट्यवधी रुपये दिले जात असल्याचे बोलले जात आहे. तरीही कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे त्रस्त कर्मचारी नोकरी सोडत असल्याचे कळते परंतु आपला लाखोंचा पगार कंपनी गिळंकृत करेल या भीतीने काही डॉक्टर आणि कर्मचारी काम करत आहेत. याबाबत ठाणे महापालिका प्रशासन उदासीन असून पगार आणि दवाखान्याचा कारभार आदी जबाबदारी कंपनीची असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

सुरुवातीपासून वादग्रस्त राहिलेल्या या कंपनीविरुद्ध आणि संचालकांविरुद्ध पॅथोलॉजी आणि औषधांची बिले अदा न केल्याबाबत नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. मेडेनगो कंपनीला विविध सेवा देणाऱ्या मॅजिक दिल हेल्थ फ़ॉर ऑल कंपनीचे संचालक डॉ. राहुल घुले यांनी मेडिनगो कंपनीचे संचालक बालाजी कृष्णमगरूर, पुनीत गुरनानी आणि शिवा किचलु यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. कर्नाटकच्या मेडिनगो कंपनीने जवळपास तीन कोटी ८० लाखांची बिले दिली नसल्याचे डॉ. राहुल घुले यांनी सांगितले.