बदलापूर : मुंबई अरबी समुद्रात एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत, बदलापूर येथील रहिवासी आणि नौदलात कर्मचारी असलेले मंगेश केळशीकर (३४) यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. केळशीकर यांच्या पश्चात आई, गर्भवती पत्नी आणि चार वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.
गेट वे ऑफ इंडियाजवळ अरबी समुद्रात, बुधवार १८ रोजी प्रवासी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीच्या बसलेल्या जोरदार धडकेत प्रवासी बोट उलटल्याची घटना घडली. या दुर्घटनेत 13 प्रवाशांचा मृत्यू झाला.
नौदलाच्या स्पीड बोटवर कर्मचारी म्हणून सेवा बजावत असलेले व बदलापूर पूर्व कात्रप गोकुळ आवास या इमारतीत राहत असलेले मंगेश केळशीकर यांचा देखील या दुर्घटनेत अंत झाला असून, त्यांच्या घरात एकमेव कमावती व्यक्ती असलेल्या मंगेश यांच्या मृत्यू पश्चात, त्यांची तीन महिन्यांची गर्भवती पत्नी, चार वर्षाचा मुलगा आणि वृद्ध आई आज निराधार झाले आहेत. मंगेश यांच्या गर्भवती पत्नीने त्यांच्या मृत्यूचा मोठा धक्का घेतला आहे.
मंगेश केळशीकर (३४ ) हे भारतीय नौदलात मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. बुधवारी नौदलाच्या स्पीड बोटीवर इंजिनच्या टेस्टिंगचे काम सुरु असताना, काही कळायच्या आतच, स्पीड बोटवरील नियंत्रण गमावून ही स्पीड बोट एलिफंटाला जाणाऱ्या प्रवासी बोटीला धडकली. या धडकेत प्रवासी बोटीवरील अनेक प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आणि याच दुर्घटनेत स्पीड बोटवर काम करत असलेल्या मंगेश केळशीकर यांचा देखील मृत्यू झाला.