दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन अंतिम फेरीत

ठाणे: दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन संघाने पय्याडे स्पोर्ट्स क्लबचा आठ विकेट्सनी पराभव करत डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिशन आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब आयोजित पाचव्या अर्जुन मढवी स्मृती महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. प्रतिस्पर्धी पय्याडे स्पोर्ट्स क्लबला अवघ्या १०१ धावांवर गुंडाळल्यावर दिलीप वेंगसरकर स्पोर्ट्स फाउंडेशन संघाने दोन फलंदाजांच्या मोबदल्यात १०२ धावा केल्या.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या पय्याडे स्पोर्ट्स क्लबच्या फलंदाजांना खेळपट्टीवर तग धरता आला नाही. जिया मांडरवडकरने ३० धावांची खेळी करत संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. त्यात आयुषी सिंगने १६ आणि माही ठक्करने १४ धावांची भर टाकली. सिद्धी पवार आणि ख़ुशी गिरीने प्रतिस्पर्ध्यांना मर्यादित धावसंख्येवर रोखण्यास मोलाचे योगदान दिले. सिद्धीने चार, खुशीने तीन, पूनम राऊतने दोन फलंदाज बाद केले.

छोट्या आव्हानाचा पाठलाग करतानाही दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन संघाला विजयासाठी विसाव्या षटकापर्यंत वाट पहावी लागली. संघाला विजयाचा मार्ग मोकळा करून देताना श्वेता कलपथीने ५३ चेंडूत नऊ चौकारासह ५२ धावा केल्या. पूनम राऊतने १८ आणि क्रितिका कृष्णकुमारने १३ धावा बनवल्या. क्रितीका यादव आणि अभिलाषा अवतारमणीने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.

संक्षिप्त धावफलक: पय्याडे स्पोर्ट्स क्लब : २६.५ षटकात सर्वबाद १०१ (जिया मांडरवडकर ३०; सिद्धी पवार ४/१५) पराभूत विरुद्ध दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन: १९.२ षटकात २ बाद १०२ (श्वेता कलपथी ५२; क्रितीका यादव १/१६)

सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू : सिद्धी पवार (दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन).