एनआयएने अमरावती, भिवंडीतून दोन संशयितांना घेतले ताब्यात

जैश ए मोहम्मद लिंक प्रकरण

मुंबई : जैश ए मोहम्मद कट्टरतावाद प्रकरणी एनआयएने देशभरात छापेमारी केली आहे. या छापेमारीत अमरावती आणि भिवंडीतून दोघांना ताब्यात घेतले आहे. एनआयएने जैश ए मोहम्मद कट्टरतावाद प्रकरणी देशभरात छापेमारी केल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

एनआयएने भिवंडीतील खोणी गावातून एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले असून कामरान अन्सारी असे त्याचे नाव आहे. अमरावतीच्या छायानगर परिसरातून एका तरुणाला एनआयएने ताब्यात घेतले, मात्र या तरुणाचे नाव अद्याप अधिकृत सूत्रांनी दिले नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएच्या पथकाने गुरुवारी पहाटेच्या सुमारास भिवंडी तालुक्यातील निजामपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खोणी ग्रामपंचायत भागातील एका खोलीवर अचानक छापेमारी केली. या छापेमारीदरम्यान कामरान अन्सारी याला ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेला कामरान हा अनेक दिवसांपासून याच खोलीत राहत असल्याचे तपासात समोर आले आहे. आज पहाटेच्या सुमारास अमरावतीमध्येही एनआयएच्या पथकाने छापेमारी करुन एका तरुणाला ताब्यात घेतले आहे.

गेल्या वर्षी भिवंडी शहरातून देशविघातक आणि दहशतवादी कृत्यात सहभागी असलेल्या पीएफआयच्या तीन पदाधिकाऱ्यांना सुरक्षा यंत्रणांनी अटक केली. शिवाय मुंब्रा भागातूनही गेल्या दोन वर्षात संशयितांना ताब्यात घेऊन अटक केली. तर २०१४ साली कल्याणमधून चार तरुण इसिसमध्ये भरती झाले. त्यामुळे ठाणे जिल्हयात आजही देशविघातक कारवायांसाठी काही जण सक्रिय असल्याचे पुन्हा एकदा भिवंडी तालुक्यातील खोणी गावातून समोर आल्याचे दिसून येत आहे.