चिखलोली रेल्वे स्थानकाचे काम प्रगतीपथावर

मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून निविदा जाहीर

अंबरनाथ : गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान होणाऱ्या चिखलोली स्थानक निर्मितीच्या कामाने वेग घेतला आहे, रेल्वे स्थानकाचा उभारणीसाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनकडून दोन प्रकारच्या निविदा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच रेल्वेमध्ये ‘पुढील स्थानक चिखलोली’ अशी घोषणा ऐकायला मिळेल.

चिखलोली येथे होणाऱ्या रेल्वे स्थानकासाठी ओव्हर हेड उपकरणे उभारून कार्यान्वित करणे तसेच स्थानकाची उभारणी अशा दोन निविदा आहेत. दोन निविदा जाहीर झाल्या असल्या तरी गेल्या काही महिन्यांपासून स्थानकाच्या प्रत्यक्ष जागेवर विविध प्रकारची कामे सुरू आहेत.

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या माध्यमातून राज्य सरकारच्या भागिदारीत या स्थानकाची उभारणी केली जाते आहे. मुंबई नागरी परिवहन प्रकल्प ३ अ च्या माध्यमातून कल्याण आणि बदलापूर स्थानकादरम्यान १४ किलोमीटर लांबीची १५१० कोटी रूपयांच्या खर्चातून तिसरी चौथी मार्गिका टाकण्याचे काम हाती घेतले आहे. त्याचबरोबर चिखलोली स्थानकाचे काम देखील सुरू आहे. नव्या स्थानक परिसरात ओव्हरहेड उपकरणे उभारणे, त्यांचे आरेखन, तपासणी आणि कार्यान्वित करण्याच्या कामाची निविदा मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच चिखलोली रेल्वे स्थानकाच्या प्रत्यक्ष बांधकामाचीही निविदा जाहीर केली आहे. ११ कोटी ४८ लाख २ हजार ७५९ रूपयांची आणि २१ कोटी ६४ लाख ३२ हजार ९७४ रूपयांची दुसरी अशा दोन निविदांचा याच समावेश आहे.

चिखलोली रेल्वे स्थानकाची उभारणी आणि ओव्हरहेड उपकरणांची कामे पूर्ण झाल्यास रेल्वे स्थानक कार्यान्वीत होणे शक्य होणार आहे. त्यामुळे लवकरच चिखलोली रेल्वे स्थानक सुरू होण्यास मदत मिळणार आहे.

चिखलोली रेल्वे स्थानकाच्या मंजुरीसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेकांनी पाठपुरावा केला होता. त्यामुळे या स्थानकाला मंजुरी मिळाली. चार वर्षांपूर्वी तिकीट दर निश्चित करण्याचे पत्र रेल्वेने मंजूर केले. २०२२ मध्ये यासाठी आवश्यक जागेचे भूसंपादन पूर्ण करण्यात आले. २०२३ आणि २०२४ या वर्षात विविध टप्प्यातील कामांसाठी विविध निविदा जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता उर्वरीत कामांसाठी निविदा जाहीर करण्यात आली आहे.