ठाण्यात स्वतंत्र जिल्हा आयुष रुग्णालय !

* वागळे इस्टेट येथील सिव्हील रुग्णालयाच्या परिसरात रुग्णालयाचे बांधकाम लवकरच सुरू होणार
* ५० खाटांच्या आयुष हॉस्पिटलमध्ये आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, योगाचे उपचार

ठाणे : आयुर्वेदिक उपचार पद्धतीने गुण येण्यास काहीसा विलंब होत असला तरी, आयुर्वेदिक उपचार घेण्याकडे रुग्णांचा कल वाढत आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य प्रशासनाने रुग्णांची गरज ओळखून स्वतंत्र आयुष रुग्णालय ठाण्यात उभारण्यात येणार आहे. वागळे इस्टेट येथील सिव्हील रुग्णालयाच्या प्रांगणात ५० खाटांच्या जिल्हा आयुष रुग्णालयात आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानीसारख्या उपचार पद्धतीने रुग्णांवर उपचार होतील. त्यामुळे पंचकर्म सेंटर, शिरोधारा, वमन बस्तीसारखे उपचार सर्वसामान्य रुग्णांना घेता येणार आहेत.

अ‍ॅलोपॅथी उपचाराइतकेच आयुर्वेदिक उपचारावर विश्वास ठेवणाऱ्या रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळें दीर्घ आजार असणारे अनेक रुग्ण आयुर्वेदिक उपचार पद्धतीकडे वळताना दिसतात. मात्र काही वेळा आयुर्वेदिक खर्च खिशाला परवडणारा नसतो. आता ठाण्यात जिल्हा आयुष रुग्णालय उभे राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत जिल्हा आयुष रुग्णालयाचे काम येत्या काही दिवसांतच सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.

वागळे इस्टेट येथील सिव्हील रुग्णालयाच्या परिसरात आयुष रुग्णालय बांधण्यासाठी १५ कोटी मंजुर झाले आहेत. रुग्णालयाची संरचना, मनुष्यबळ, साधन सामुग्री, औषधी व निवासस्थाने इत्यादींचा सविस्तर कृती आराखडा बनवण्यात आला आहे. तळ अधिक तीन मजली इमारतीत ५० खाटा असणाऱ्या रुग्णालयात योगा, प्रतिक्षालय, अभिलेख, प्रक्रिया, मुख्य वैद्यकीय कक्ष आयुर्वेद कक्ष, स्वच्छता गृह, होमिओपॅथी कक्ष, युनानी, प्रयोगशाळा, नॅचेरोपॅथी, आदी सुविधा उपलब्ध आहेत. पंचकर्म, क्षारसूत्र आदी इतर आयुष उपचार होणार आहेत.

२८१७.१२ चौ. मी. जागेत जिल्हा आयुष रुग्णालय उभे रहाणार आहे. तळ मजल्यावर बाह्य विभाग (ओपीडी) आणि ऑफिस, पहिला मजला योगा हॉल, कॅन्टीन, गर्भ संस्कार हॉल आहे. दुसऱ्या मजल्यावर पुरुष कक्ष तर तिसऱ्या मजल्यावर महिला कक्ष, परिचारिका कक्ष आदी असणार आहे.

भारतात प्राचीन काळापासून आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी, वनस्पतीजन्य औषधी, आहाराविषयक नियम, व्यायामाचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्तीला वाढविण्यावर भर दिला जातो. अ‍ॅलोपॅथी उपचारात रुग्णाला झटपट रिझल्ट मिळत असला तरी आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानीसारख्या उपचारांनी रुग्णांना आराम मिळतो, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.

मधुमेह, हृदयरोग, रक्तदाबसारख्या आजारावर आयुर्वेदिक उपचार घेणे सर्वांना परवडत नाही. मात्र सिव्हील रुग्णालयात आयुष हॉस्पिटल होत आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी आयुर्वेदिक, होमिओपॅथी, युनानी, योगासारखे उपचार मिळणार असल्याने सर्वसामान्य रुग्णांसाठी आनंदाची गोष्ट आहे, असे ठाणे पूर्वेतील नागरिक पुंडलिक घाग यांनी सांगितले.