ठाणे जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या घटली

ठाणे: कुपोषणाचा टक्का कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने समुपदेशन, प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष आहार अशी त्रिसूत्री कार्यक्रम राबवण्यात येत आहे. यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत विशेष प्रयत्न सुरू असून ग्रामीण भागातील कुपोषित बालकांची संख्या सप्टेंबर 2024 रोजी अखेर तीव्र कुपोषित (सॅम) 88 तर मध्यम कुपोषित (मॅम) 1023 होती तर नोव्हेंबर 2024 रोजी अखेर (तीव्र कुपोषित) सॅम 22 तर मध्यम कुपोषित (मॅम) 62 कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यात यश आले आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने समुपदेशन, प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष आहार अशी त्रिसूत्री कार्यक्रम 1647 अंगणवाडीतील 83,427 बालकांसाठी राबवण्यात येत आहे. तसेच दत्तक पालक योजना, पालकसभा घेऊन मुलांचा दिनक्रम, आहाराच्या वेळा, चविष्ठ आणि तितकेच सकस अन्न बालकांना देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे.

कुपोषित बालकांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने आयआयटी मुंबईसारख्या नामांकित संस्थाचा देखील सहभाग घेण्यात आला असून बालकांची काळजी घेण्यासाठी व्हिडीओमार्फत तसेच पालकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांनी दिली आहे.

गरोदरपणात मातेला योग्य सकस आहार न मिळाल्यास मूल कुपोषित जन्माला येण्याची शक्यता असते. तर मूल जन्मल्यानंतर त्याला मातेचे पुरेसे दूध व पोषण आहार न मिळाल्यास बालके कुपोषणाच्या विळख्यात अडकू शकतात. त्यामुळे गरोदरपणात व प्रसूतीनंतर मातांना व सहा महिन्यांनंतर बालकांना नियमितपणे अंगणवाडी सेविकांमार्फत पोषण किटवाटप करण्यात येत आहे.

जिल्हा प्रशासनाकडून गरोदर व स्तनदा मातांना बाळंतवीडा, कुपोषित मुलांना पोषकवडी, स्तनदा मातांना पाळणा इ. नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. त्याचबरोबर विविध स्वंयसेवी संस्था (उदा.स्नेहा फाऊंडेशन, अन्नदा फाऊंडेशन इ.) च्या मदतीने डोळखांब/ शहापूर प्रकल्पातील कुपोषित बालकासाठी कामकाज करण्यात येत आहे. परिणामी प्रतीवर्ष कुपोषीत बालकांमध्ये सुधारणा टक्केवारीत वाढ होत आहे.

जिल्ह्यातील मागील तीन महिन्यातील कुपोषित बालकांची संख्या

सप्टेंबर 2024 रोजी अखेर तीव्र कुपोषित (सॅम) 88 तर मध्यम कुपोषित (मॅम) 1 हजार 023, ऑक्टोबर 2024 रोजी अखेर तीव्र कुपोषित (सॅम) 76 तर मध्यम कुपोषित (मॅम) 1009, नोव्हेंबर 2024 रोजी अखेर तीव्र कुपोषित (सॅम) 66 तर मध्यम कुपोषित (मॅम) 961 आहेत.

गूळ, शेंगदाणे आणि ‘जागर’

ठाण्यातील जागर फाऊंडेशन संस्थेने तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर तालुक्यात कमी वजनाच्या बालकांसाठी गूळ आणि शेंगदाणे असा नियमित आहार सुरू केला होता. याकामी महिला बालविकास विभाग आणि त्याअंतर्गत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे चांगले सहकार्य लाभले. या उपक्रमामुळे मुलांच्या वजनात चांगलीच वाढ झाल्याचे आढळून आले होते. सामाजिक संस्थांनी अशा उपक्रमात प्राधान्याने पुढारपण घेण्याचे आवाहन जागर फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेश सोंडकर आणि सचिव विनोद येतुस्कर यांनी केले आहे.