बदलापूर : बदलापूरमध्ये आज घरगुती सिलेंडरच्या स्फोटात जवळील इमारतीतील घरांचे नुकसान झाले असून या दुर्घटनेत एक जखमी झाल्याची घटना घडली असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे.
बदलापूर पश्चिमेकडील नामदेव प्लाझा या इमारतीच्या आवारात उभ्या असलेल्या हातगाडीवर आज सकाळी दहाच्या सुमारास अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटाच्या दणक्याने नामदेव प्लाझा या इमारतीमधील अनेक घरांच्या काचा फुटून, घरात काचांचा खच पडला. यावेळी स्फोटाच्या आवाजाने, संपूर्ण परिसरात घबराट पसरली आहे. या घटनेत इमारतीचा सुरक्षा रक्षक नीरज चेत्री जखमी झाला आहे. त्याला खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पश्चिम भागात मांजर्ली येथील, म्हात्रे चौक परिसरातील नामदेव प्लाझा इमारतीच्या मागील बाजूस मोकळ्या जागेत हातगाडी ठेवण्यात आली होती. सकाळी या मोकळ्या आवारातील कचरा आणि वाढलेले गवत जाळण्यात आले. त्यावेळी, ही आग पसरली आणि हातगाडीपर्यंत आग पसरली. त्यातच लाकडी हातगाडीने लगेच पेट घेतला. यावेळी गाडीच्या खाली कपाटात असलेल्या सिलेंडरने पेट घेतला आणि मोठा स्फोट झाला. स्फोटाच्या हादऱ्याने जवळील इमारतीमधील घरांच्या खिडक्या फुटून काचांचा खच पडला होता.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे, या हातगाडीचा सांगाडा शिल्लक राहिला असून, स्फोटाच्या आवाजाने कानठळ्या बसून, संपूर्ण परिसर हादरून गेला होता. यांनतर पालिकेने या प्रकरणाची दखल घेत, परिसरातील सगळ्या हातगाड्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.