नवी मुंबई : मुलांच्या अंगात बापाचं रक्त असतं, त्यामुळे आपले वडील हे मुलीसाठी नेहमीच हिरो असतात. आपल्या दीड वर्षाच्या मुलीचे यकृत नादुरुस्त झाल्याने मृत्यूशी झुंजणाऱ्या आपल्या पोटच्या पोरीला मृत्यूच्या दारातून परत आणण्यासाठी बापाने यकृत दान केले आणि लेकीचा जीव वाचविला. शाहबाज खान असे त्या व्यक्तीचे नाव असून ते नवी मुंबईतील सीबीडी सेक्टर एकमध्ये वास्तव्यास आहेत.
शहाबाज खान यांची १९ महिन्यांची मुलगी आमराह खान हिच्या यकृताचा काही भाग खराब झाल्याने मागील तीन चार महिन्यांपासून तिला त्रास होत होता. त्यामुळे तिला तातडीने यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मुलीचा रक्तगट जुळत असल्याने तिचे ३४ वर्षीय वडील शाहबाज खान यांनी आपले यकृत मुलीला दान करण्याचा निर्णय घेतला. यासाठी मुंबईतील हाजी अली येथील नारायण हेल्थ एस आरसीसी चिल्ड्रन् हॉस्पिटलमध्ये ते १८ नोव्हेंबरला भरती झाले. २४ नोव्हेंबर रोजी हॉस्पिटलमधील यकृत प्रत्यारोपण करणाऱ्या तज्ज्ञांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून आता दोघांचीही प्रकृती चांगली आहे. त्यामुळे शहाबाज खान हे खऱ्या आयुष्यात आपल्या लेकीसाठी खरे हिरो ठरले आहेत.