सरनाईकांची शहरविकास खात्यावर सडकून टीका!
ठाणे : शहरविकास विभागाने नियम धाब्यावर बसवून सर्वसामान्यांचे हीत जपण्याऐवजी बांधकाम व्यावसायिकांचा फायदा करून दिल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे.
ठामपा आयुक्त सौरभ राव यांना दिलेल्या पत्रात त्यांनी शहर विकास विभागाच्या गलथान कारभाराची जंत्रीच दिली आहे. या सर्व प्रकरणांची चौकशी करून अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी आ. सरनाईक यांनी केली आहे.
विहंग व्हॅली ते हावरे सिटीपर्यंतचा ४० मीटरचा रस्ता हा ग्रीन झोनमधून वळवण्यात आला असून विकासकांच्या फायद्याच्या दृष्टीने या रस्त्यावरील आर झोनचा चटई निर्देशांक व आर झोनचे नियम धाब्यावर बसवून या विकासकांना आर झोनचा फायदा देण्यात आला आहे. घोडबंदर रोडवरील पातलीपाडा येथील हिरानंदानी वन शेजारील विकासकाच्या जागेवर आदिवासी जमीन तसेच सनद व यु.एल.सी. कायद्यांतर्गत अनेक त्रुटी असल्यामुळे तत्कालिन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हे प्रकरण नामंजूर केले होते. परंतु, आता या भुखंडावर नियमबाह्यरितीने नकाशे मंजूर करण्यात येत असल्याचे आ.सरनाईक यांचे म्हणणे आहे. शिवाईनगर येथील निळकंठ हाईटस् या सोसायटीचा एफ.एस.आय. त्याच सोसायटीच्या मोकळ्या भुखंडावर उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पात विकासक वापरत असल्याची तक्रार सोसायटीच्या सभासदांनी दिली असतानाही त्याकडे लक्ष दिले जात नाही. तसेच या भुखंडावर असलेल्या बेघरांसाठी घरे महानगरपालिकेच्या ताब्यात आलेली नाहीत. या भुखंडावरून जाणारा डी.पी. रस्ता अतिक्रमणासहित विकासकांच्या ताब्यात अद्यापपर्यंत असून प्रॉव्हिडन्ट इनव्हेस्टमेंट कंपनीच्या बोगस “ना-हरकत प्रमाणपत्राद्वारे” या विकासकांचे नकाशे मंजूर करण्यात येत आहेत. येऊर येथे इको सेंसेटिव्ह झोन असताना सुध्दा तेथील काही प्रकल्पांना सी.सी. व काही जुन्या प्रकल्पांना ओ.सी. प्रमाणपत्र देण्यात येत आहेत.
त्याचप्रमाणे टिकुजीनी वाडी येथील निळकंठ वुड्सच्या विकासकाने इको सेंसेटिव्ह झोन व मोठ्या प्रमाणात चटई निर्देशांकाचे उल्लंघन केल्यानंतर देखील शहर विकास विभागातर्फे विविध परवानग्या देण्यात येत आहेत. पोखरण रोड नं. २ वरील एका बहुचर्चित आणि प्रचंड मोठ्या अशा गृहसंकुलाच्या विकासकाने इको सेंसेटिव्ह झोन, केमिकल झोन, महसुल खात्यातील यु.एल.सी. तसेच सनदचे पुर्ण पैसे शासनाला प्रदान केलेले नसतानाही परवानगी देऊन त्यांच्याकडून सुविधा भुखंड व आर. जी. भुखंड महानगरपालिकेने स्वतंत्ररित्या ताब्यात घेतलेला नाही. जवाहरनगर मधील नागरिकांच्या अनेक तक्रारी असतानाही विकासकाला फायदा होईल अशा रितीने शहर विकास विभाग निर्णय देत आहे.
शहरातील अनेक विकासकांनी आरक्षित भुखंड, सुविधा भुखंड व आर. जी. भुखंड यांना चांगल्या प्रकारची कुंपण भिंत घालून, सातबाऱ्यावर महानगरपालिकेचे नाव चढवून महानगरपालिकेच्या ताब्यात दिलेले नसतानाही अशा विकासकांना शहर विकास विभागाचे अधिकारी पाठीशी घालत असून त्यांना सी.सी. प्रमाणपत्रासह अनेक फायदे देण्यात येत आहेत. त्यामुळे ठाणे शहरातील सर्वसामान्य नागरिकांना सुविधांपासून वंचित करण्याचे काम शहर विकास विभाग करीत आहे. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या असून मला माहित असलेल्या व नसलेल्या गोष्टी शहर विकास विभागाकडून घडत आहेत. महानगरपालिकेचे जुने अधिकारी निवृत्त झाले आहेत तर महानगरपालिकेची माहिती नसलेले सहाय्यक संचालकाचे पद हे फक्त खुर्ची उबवण्यासाठी व स्वतःचे आर्थिक हीत जोपासण्यासाठी काम करीत असतात, अशी खरमरीत टीका आ. सरनाईक यांनी केली आहे.