ठाणे : सलामीला आलेल्या महेक पोकरची कर्णधारपदाला साजेशी धडाकेबाज शतकी खेळी हे व्हिक्टरी क्रिकेट क्लबने स्पोर्ट्सफिल्ड क्रिकेट क्लबवर मिळवलेल्या मोठया विजयाचे वैशिष्ट्य ठरली. डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब आयोजित पाचव्या अर्जुन मढवी स्मृती महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत व्हिक्टरी क्रिकेट क्लबने २९३ धावांचा पाठलाग करणाऱ्या स्पोर्ट्सफिल्ड क्रिकेट क्लबला ९१ धांवात गुंडाळत २०२ धावांचा मोठा विजय साजरा केला.
सेंट्रल मैदानावर सुरु असलेल्या स्पर्धेतील पाचव्या सामन्यात महेक आणि अलीना मुल्ला या सलामीच्या जोडीने दिडशतकी भागीदारी रचत संघाच्या मोठया धावसंख्येचा पाया रचला. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी ३० चौकार आणि एक षटकारासह १५५ चेंडूत १८४ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. अलिना ६१ धावांवर बाद झाल्यावर ही भागिदारी संपुष्टात आली. अलिनानाने अर्धशतकी खेळीत ११चौकार आणि एक षटकार ठोकला. महेकने १०१ चेंडूत २० चौकार मारत ११२ धावा केल्या. महेकने झळकावले हे शतक या आवृत्तीतील पहिले शतक होते. तसेच क्रितिका यादवने ४८ धावा करून संघाच्या धावसंख्येचा बढती केली.
आकृती भोईरने दोन, पलक धरमशी आणि दिपीका भारियाने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.
या मोठया आव्हानाचा पाठलाग करताना प्रियंका राठोड आणि पलक धरमशीचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना खेळपट्टीवर तग धरता आला नाही. प्रियंकाने ३१ आणि पलकने २९ धावा केल्या. प्रतिस्पर्ध्यांच्या फलंदाजाना दडपणाखाली ठेवताना अलिनानाने तीन, प्रिशा देवरुखकर, विधी मथुरिया आणि तन्वी परबने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. शतकवीर महेक पोकरला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.
संक्षिप्त धावफलक: व्हिक्टरी क्रिकेट क्लब : ४० षटकात ४ बाद २९३ (महेक पोकर ११२; आकृती भोईर २/५९) विजयी विरुद्ध स्पोर्ट्सफिल्ड क्रिकेट क्लब : ३०.१ षटकात ९१ (प्रियंका राठोड ३१; अलिना खान ३/२७).
सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू: महेक पोकर (व्हिक्टरी क्रिकेट क्लब).