तिसऱ्या मिनी राष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे भव्य उद्घाटन

१६ वर्षांनी ठाण्यात रंगणार राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा

ठाणे: संपूर्ण देशातील उभरत्या खेळाडूंसाठी एक महत्त्वाचा टप्पा मानण्यात येणारी ११ वर्षाखालील मिनी राष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा यंदाचे वर्षी आयोजित करण्याचा मान ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनला मिळाला आहे. तब्बल १६ वर्षांच्या दीर्घ अवधीनंतर ठाणे जिल्ह्यात भव्य स्तरावर राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन होत आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहातील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल येथे या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला.
ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि क्रीडा उपायुक्त मीनल पालांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले. त्याचप्रमाणे या सोहळ्याला एचडीएफसी ऍसेट मॅनेजमेंट को. लिमिटेडचे एचआर हेड आलोक शिवपूरकर आणि बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यातर्फे निरीक्षक म्हणून मयूर पारेख हे देखील उपस्थित होते.

संपूर्ण देशातील एकूण ३२ विविध राज्यांमधून अव्वल दर्जाच्या ३०० हून अधिक चिमुकल्या खेळाडूंनी आपापल्या राज्याचे प्रतिनिधित्व करीत या स्पर्धेला हजेरी लावली आहे. एकूण पुढील चार दिवस चालणाऱ्या स्पर्धेत आसाम, त्रिपुरा, जम्मू व काश्मीर, झारखंड, मिझोराम, अंदमान निकोबार, मनिपुर, सिक्कीम, चंदीगड, पंजाब, दिल्ली, अरुणाचल प्रदेश अशा विविध राज्यांमधील उभरते खेळाडू सहभागी होत आहेत. सदर स्पर्धेला एचडीएफसी ऍसेट मॅनेजमेंट को. लिमिटेड त्याचप्रमाणे ओएनजीसी यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याचा या स्पधेच्या यशस्वी आयोजनात सिंहाचा वाटा आहे.

स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी संदीप माळवी यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना सदर स्पर्धेचे ठाणे शहरातील आयोजन ही एक मोठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले.

मीनल पालांडे यांनी देखील तोंड भरून कौतुक करीत या आयोजनासाठी जिल्हा असोसिएशनचे अभिनंदन केले.

बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे मयूर पारेख यांनी देखील या उत्तम आयोजनाची नोंद घेतली आणि त्याची पोचपावती देखील जिल्हा असोसिएशनला दिली आहे. इतक्या कमी वयात त्यांना स्पर्धात्मक पातळीवर कसा खेळ चालतो याची जाणीव तसेच अनुभव ही त्यांच्या भविष्यासाठी अतिशय फायदेशीर ठरेल असे ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ प्रशिक्षक श्रीकांत वाड यांनी व्यक्त केले आहे. या राष्ट्रीय स्पर्धांचे अंतिम सामने आणि पारितोषिक वितरण समारंभ दिनांक 7 डिसेंबर 2024 रोजी पार पडणार आहे.