ठाणे: भाजपाच्या विधीमंडळ पक्ष गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाल्यानंतर भाजपाच्या ठाण्यातील कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली वर्तकनगर येथील पक्षकार्यालयासमोर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज दुपारी फटाके फोडत विजयाच्या घोषणा देऊन आनंदोत्सव साजरा केला.
भाजपाच्या विधीमंडळ पक्षाची मुंबईत आज बैठक झाली. या बैठकीत विधीमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याचे वृत्त धडकताच, भाजपाच्या वर्तकनगर येथील विभागीय कार्यालयात जल्लोष करण्यात आला. विधानसभा निवडणुकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकसंधपणे केलेली मेहनत फळाला आली असल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली. त्यानंतर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वात मिठाई वाटत महिला कार्यकर्त्यांनी फुगड्या घालून आनंद व्यक्त केला. या वेळी माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या विकासात २०१४ ते २०१९ या काळात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मोठे योगदान दिले होते. आता पुन्हा देवेंद्र फडणवीस यांची उद्यापासून मुख्यमंत्रीपदी निवड होत आहे, हा समस्त महाराष्ट्रासाठी व भाजपाच्या कार्यकर्त्यांसाठी आनंदाचा क्षण आहे. प्रगतीपथावर असलेला महाराष्ट्र आता भविष्यात आणखी मोठी भरारी घेईल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी व्यक्त केला. तसेच लाडकी बहीण योजनेतील बहिणींना आणखी आर्थिक बळ मिळेल, असे संजय वाघुले यांनी सांगितले.