मुंबई : बुलेट ट्रेन प्रकल्पातील वांद्रे-कुर्ला संकुल येथे भूमिगत स्थानकाचा उभारणीतील महत्वाचा टप्पा असलेला पहिला बेस स्लॅब टाकण्याचे काम नुकताच पूर्ण झाले. हा स्लॅब ३२ मीटर खोलीवर टाकण्यात आला असून तो १० मजली इमारती एवढा आहे.
नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम हाती घेतले आहे. बुलेट ट्रेन ५०८ किमी लांबीची असून या मार्गावरील वांद्रे -कुर्ला संकुल हे एकमेव स्थानक भूमिगत स्वरूपात बांधले जाणार आहे. या स्थानकाचा पहिला काँक्रीट बेस स्लॅब ३० नोव्हेंबर रोजी टाकण्यात आला. हा स्लॅब जमिनीपासून सुमारे ३२ मीटर खोलीवर टाकण्यात आला आहे. जमिनीच्या पायापासून काँक्रीटचे काम सुरू करण्यात आले आहे.
बुलेट ट्रेन मार्गिकेवर एकूण १२ स्थानके असणार आहेत. यामधील आठ स्थानकांची गुजरातमध्ये, तर चार स्थानकांची महाराष्ट्रात उभारणी केली जाणार आहे. यामध्ये वांद्रे – कुर्ला संकुल, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, बडोदे, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती या स्थानकांचा समावेश आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरमधील वांद्रे-कुर्ला संकुल स्थानक हे एकमेव भूमिगत आहे. वांद्रे-कुर्ला संकुलाच्या मध्यभागी हे ३२ मीटर खोल स्थानक बांधण्यासाठी सुमारे १८.७ लाख घनमीटर उत्खनन करण्यात येणार आहे. त्यापैकी ५२ टक्के उत्खनन पूर्ण झाले आहे. प्रकल्पस्थळी सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक उपकरणांचा वापर करण्यात येत आहे. पहिला बेस स्लॅब हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, अशी माहिती हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विवेक कुमार गुप्ता यांनी दिली.