यंदा परदेशी मलावी हापूसच्या चव कमी चाखायला मिळणार

बाजारात आवक निम्यावर

नवी मुंबई: यंदा मलावी हापूसच्या उत्पादन अवघे ५० टक्के असल्याने वाशीतील एपीएमसी फळ बाजारात एक दिवस आड करून मलावी हापूस दाखल झाला आहे. त्यामुळे यंदा परदेशी आंब्याची चव कमी चाखायला मिळणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.

दरवर्षी कोकणातील हापूस आंब्याची चव चाखण्यासाठी ग्राहक या आंब्याची वाट पाहत असतात. हापूस अवीट गोडीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे कोकणातील हापूसला जितकी मागणी भारतात आहे, तितकीच मागणी परदेशात देखील आहे. मात्र कोकणातील हापूस आंब्याचा मुख्य हंगाम मार्चमध्ये सुरू होतो. मात्र ज्या प्रकारे कोकणातील हापूस परदेशात दाखल होतो. त्याच प्रमाणे मागील काही वर्षांपासून आफ्रिका खंडातील मलावी
हापूस भारतात दाखल होत आहे.

हापूस आंब्याची चव, रंग, सुगंध कोकणातील हापूस प्रमाणेच असल्याने व बाजारात लवकर दाखल होत असल्याने याला चांगली मागणी असते. बाजारात हा आंबा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आफ्रिकन मलावी हापूस दाखल होतो. यंदा उत्पादन कमी असल्याने बाजारात डिसेंबर अखेरपर्यंत मलावी हापूस हंगाम असणार आहे. मागील वर्षी या काळात तीन हजार बॉक्स दाखल झाले होते तर यंदा आतापर्यंत केवळ १२०० बॉक्स दाखल झाले आहेत. तीन किलो पेटीला २२०० ते पाच हजार रुपये बाजारभाव आहे. यंदा मलावी हापूसचे उत्पादन ५०टक्के आहे. त्यामुळे आवक कमी होईल तसेच आकाराने लहान असलेले हापूस अधिक दाखल होत आहेत, अशी माहिती फळ बाजार संचालक संजय पानसरे यांनी दिली आहे.