महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी राज्य सरकारने सुट्टी जाहीर केली आहे. महाराष्ट्र सरकारने ६ डिसेंबर हा दिवस स्थानिक सुट्टी म्हणून जाहीर केला आहे.
या दिवशी राज्य सरकारच्या अखत्यारीतील कार्यालयं, संस्था आणि शाळा तसंच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हे आदेश मुंबई आणि मुंबई उपनगरातील राज्य शासकीय/निमशासकीय कार्यालयांना लागू आहेत.
डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी दादर, मुंबई येथील चैत्यभूमीवर देशभरातून लाखो अनुयायी जमतात. महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यभरातून मुंबईत येणाऱ्या अनुयायांसाठी ४ ते ७ डिसेंबरपर्यंत विशेष बस प्रवासाची योजना करण्यात आली आहे. त्याशिवाय दादर रेल्वे स्थानकापासून ते चैत्यभूमीपर्यंत १५ ते २० मिनिटांच्या अंतरावर बस सेवा देण्यात येणार आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यभरातून येणाऱ्या अनुयायांसाठी रेल्वेची खास सुविधा करण्यात आली आहे. गुरुवारी ५ डिसेंबर मध्यरात्रीपासून परेल-कल्याण आणि कुर्ला-पनवेल स्थानकांदरम्यान १२ विशेष लोकल ट्रेन चालवल्या जाणाऱ्या आहेत. या सर्व अतिरिक्त ट्रेन सर्व स्थानकांत थांबतील. ५ आणि ६ डिसेंबर या दोन दिवशी अतिरिक्त ट्रेन धावणार आहेत.
दरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचे लाखो अनुयायी दादर येथील चैत्यभूमीवर येतात. या सर्व अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी बीएमसीसह राज्य सरकारद्वारे सर्व तयारी करण्यात आली आहे.
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी येथे आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. या बैठकीत भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑनलाइन सहभागी झाले होते. तसंच बैठकीला राज्यमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक तसंच इतर उपस्थित होते.