ठाणे : भाजपाचे वरिष्ठ नेते गिरीश महाजन यांनी सोमवारी रात्री ठाण्यात काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे मात्र कळू शकले नाही. परंतु देवेंद्र फडणवीस यांचा कोणता संदेश महाजन यांनी ठाण्यात पोहोचवला याबाबत तर्क वितर्क सुरू झाले आहेत.
गिरीश महाजन यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी जाऊन सुमारे एका तास चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना फक्त तब्येतीची चौकशी करण्यासाठी आजची भेट होती, असे स्पष्ट केले. महायुतीत सर्व आलबेल आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नसून शपथविधी वेळेवर होणार असल्याचे श्री.महाजन म्हणाले. श्री.शिंदे यांना आजही सलाइन लावण्यात आली होती. या आधीच त्यांनी सत्ता स्थापनेबाबत सकारात्मक भूमिका जाहीर केली आहे. केवळ माध्यमांची सूत्रे कंड्या पिकवत असल्याचेही श्री.महाजन म्हणाले.