ठाणे: विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात महायुतीला मोठे यश मिळाले. त्यात भाजपाला १०० टक्के यश मिळाल्याने भाजपाने स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली आहे तर त्या पाठोपाठ आता ठाणे शहरात शिवसेना शिंदे गटाने देखील दंड बैठका सुरू केल्या आहेत.
एकीकडे भाजपची ताकद वाढवण्यासाठी सदस्य मोहिम सुरू झाली आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटानेही ‘युवासेना एकसाथ, महापालिकेतही एकनाथ’ असा नारा देत आता मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीची शक्यता धुसर असून ठाण्याची शतप्रतिशत सुभेदारी मिळवण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्येच प्रमुख लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ठाणे महापालिकेची अखेरची निवडणूक २०१७ साली झाली होती. त्यानंतर २०२२ मध्ये कार्यकाळ संपल्यामुळे ती विसर्जित झाली. कोव्हिडमुळे आधी निवडणूक लांबणीवर पडली. तर नंतर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे आल्याने गेल्या तीन वर्षांपासून पालिकेची निवडणूक खोळंबली आहे. आता सत्तास्थापनेनंतर पालिका निवडणुका होतील या आशेने लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये झोकून दिलल्या सर्व माजी नगरसेवकांसमोर आशेचा किरण दिसू लागला आहे. पण त्याचवेळी जर पॅनलपद्धतीने निवडणुका झाल्या आणि त्यातही महायुती-आघाडी अशी शक्यता निर्माण झाल्यास आपल्या वाटेला काय येणार याची चिंताही सतावू लागली आहे. वास्तविक ठाणे महापालिकेवर गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेने सत्तेचे पहिले यश ठाण्यातून मिळवले होते. त्यामुळे ठाण्यावर शिवसेनेचे वर्चस्व कायम राहिले आहे. राज्यात भाजपसोबत युती असली तरी ठाण्यात शिवसेनेचा नेहमीच वरचष्मा राहिला आहे. त्यामुळे सत्तेत शिंदे गटाला भाजपाची भागिदारी नको असल्याचीही चर्चा सुरू आहे.
२०१७ साली झालेल्या महापालिका निवडणुकीत तर शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवली. १३१ पैकी ६७ नगरसेवक निवडून आणले. तर २३ नगरसेवकसंख्या असलेला भाजप तिसर्या क्रमांकावर होता. दुसर्या क्रमांकावर राष्ट्रवादीचे नगरसेवक होते.
आता या वर्चस्वाला आव्हान देण्याची तयारी भाजपकडून सुरू झाली आहे. विधानसभेच्या यशानंतर भाजपने मिशन पालिका सुरू केले आहे. प्रत्येक विधनासभा मतदारसंघामध्ये एक लाख सदस्य मोहिम हाती घेतली आहे. नगरसेवकांची संख्या वाढवण्याचे उद्धीष्ट त्यांच्यासमोर असले तरी ठाणे महापालिका ताब्यात घेण्याचे स्वप्न ते पाहत आहेत. याला उत्तर म्हणून शिवसेना शिंदे गटानेही मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांमध्ये युवा सेना महत्वाची भूमिका पार पाडण्यासाठी सज्ज होत आहे. शनिवारी युवासेनेचे कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्त्वात झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये संघटनात्मक पुर्नरचना, युवकांचा सहभाग, महिला सबलीकरण आणि पक्षाच्या भविष्यातील धोरणांवर भर देण्यात आला. त्यादृष्टीने राज्यस्तरीय क्रीडा, सांस्कृतिक महात्सवाचे आयोजन करण्यासोबत सामुदायिक संपर्क राबवण्यावर भर देण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी युवासेना मिनी कॅबिनेट स्थापन करून समन्वय साधण्याचा निर्णय घेण्यात आला. या सर्वांमध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे युवासेना एकसाथ, पालिका निवडणुकांमध्येही एकनाथ हे घोषवाक्य मांडण्यात आले. आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टीने हे घोषवाक्य तयार करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.