ठाकरे गटाच्या तंबूतच सरनाईक ठरले वरचढ

नरेश मणेरा यांच्याच प्रभागात ११ हजारांचे मताधिक्य

ठाणे : ओवळा-माजिवडा मतदार संघातील महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आमदार प्रताप सरनाईक यांनी महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार नरेश मणेरा यांच्या प्रभाग क्र. १ मध्येच सुमारे ११ हजारांचे मताधिक्य घेऊन त्यांच्यावर मात केली. या मतदार संघातील सर्वच प्रभागात महायुती वरचढ ठरली आहे.

ठाणे महापालिका आणि मीरा-भाईंदर महापालिकेमध्ये ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघ विभागला गेला आहे. या मतदार संघातून महायुतीने शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. महाविकास आघाडीने शिवसेना ठाकरे गटाचे नरेश मणेरा यांना उमेदवारी दिली होती. या मतदारसंघात मनसेने संदिप पाचंगे हे देखील उमेदवार होते, परंतु खरा सामना आघाडी आणि महायुतीमध्ये झाला होता.

ठाणे महापालिका हद्दीत मोडणाऱ्या घोडबंदर येथिल प्रभाग क्रमांक एकचे माजी नगरसेवक नरेश मणेरा आहेत. याच प्रभागात आमदार सरनाईक यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ११,१६२ इतका लीड घेतला. आ. सरनाईक यांना २४,०६२ मते मिळाली तर श्री. मणेरा यांना १२,९०० इतकी मते मिळाली होती. प्रभाग क्र. चारचा अर्धा भाग या मतदारसंघात मोडतो. या प्रभागात श्री. मणेरा यांना २६७४ मते मिळाली तर आमदार सरनाईक यांनी ७०७३ मते मिळवून ४,३९९ मतांचा लीड घेतला.

प्रभाग क्र. ५मध्ये आमदार सरनाईक यांना १७,३६० इतकी मते मिळाली तर श्री. मणेरा यांना ६,२६२ इतकी मते मिळाली. आ. सरनाईक यांनी या प्रभागात ११०९८ इतके मताधिक्य घेतले आहे. प्रभाग क्रमांक सहा येथे एकूण २७,८८५ इतके मतदान झाले होते. त्यापैकी १७,३३७ मते आमदार सरनाईक यांना मिळाली होती. श्री. मणेरा यांना ६,९४६ इतकी मते मिळाली. आ. सरनाईक यांनी या प्रभागात १०,३९१ मतांचा लीड घेतला आहे. प्रभाग क्रमांक सातमध्ये आ. सरनाईक यांना १४,९३३ मते मिळाली तर श्री. मणेरा यांना ६,५९४ मते मिळाली. आ सरनाईक यांनी ८,३३९ इतके मताधिक्य घेतले. प्रभाग क्र. आठचा अर्धा भाग या मतदार संघात मोडतो. तेथे आ. सरनाईक यांना ५८३७ तर श्री. मणेरा यांना २,२८० इतकी मते मिळाली. आ. सरनाईक यांनी ३५५७ मते अधिक मिळवली. प्रभाग क्र. १४ चा देखील अर्धा भाग या मतदारसंघात मोडतो. येथे श्री.सरनाईक यांनी ७,६९३ मते मिळाली तर श्री.मणेरा यांना २,६५८ मते मिळाली. आ. सरनाईक यांना ५०३५ इतके मताधिक्य मिळाले आहे.

या सात मतदारसंघात दोन लाख ६६,६६२ मतदार असून त्यापैकी एक लाख ४९,५८३ इतके मतदान झाले होते. त्यापैकी आ.सरनाईक यांना ९४,२९५ मते मिळाली तर श्री. मणेरा यांना ४०,३१४ इतकी मते मिळाली. ठामपा हद्दीत आ.सरनाईक यांनी तब्बल ५३,९८१ इतका लीड घेतला आहे.

आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत या मताधिक्याचा फायदा होणार आहे. आ. सरनाईक यांनी या मतदारसंघात मागिल पाच वर्षांत विकासकामे केली होती. त्याचा फायदा या निवडणुकीत झाला. त्यांना तब्बल एक लाख ८५ हजार मते मिळाली. राज्यात सर्वाधिक मते त्यांनी मिळवली असून एक लाख नऊ हजार मतांचा लीड देखील त्यांना मिळाला आहे. आ सरनाईक यांना या मतदार संघातील मतदारांनी चौथ्यांदा विधानसभेत पाठवले असून विकासकामे करणारा आमदार अशी त्यांची राज्यात प्रतिमा झाली असल्याचे त्यांचे समर्थक दावा करत आहेत.