ठाणे: येथे रहाणार्या स्मिता काजळे यांनी ऑस्ट्रेलियात झालेली आयर्न-मॅन ही अत्यंत आव्हानात्मक ट्रायथलॉन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली असून अशी दुर्मिळ कामगिरी बजावणार्या त्या जिल्ह्यातील या वयोगटातील पहिल्या महिला ठरल्या आहेत.
ऑस्ट्रेलियातील बसॅल्टन शहरात झालेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत १११२ स्पर्धकांनी भाग घेेतला होता. त्यात समुद्रात ३.८ कि.मी. पोहणे १८० कि.मी. सायकलिंग आणि ४२.० कि.मी. धावणे असे तीन प्रकार असतात. सकाळी ७.१५ वा सुरू झालेले हे तीन प्रकार संपायला रात्रीचे १२.१५ वाजले होते. ५०-५५ विभागात एकूण ३१ महिलांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी दोघी भारतीय होत्या. श्रीमती काजळे यांनी १६ तास ३९ मिनिटांत ही कामगिरी बजावली. २.०९ तास पोहल्यावर ७.४९ तास सायकल चालवणे आणि पाठोपाठ ६.२१ तास धावणे अशी अशक्य आणि शारीरिक कसोटी पहाणारी स्पर्धा श्रीमती काजळे यांनी लीलया पूर्ण केली. त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या डिसेंबरमध्ये पन्नाशीत पदार्पण करणार्या स्मिता काजळे या आंतरराष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्यासाठी गेले आठ महिने प्रचंड परिश्रम घेत होत्या. राज्य शासनाच्या नगररचना विभागात प्रथम श्रेणी अधिकारी असणार्या काजळे यांनी शारीरिक क्षमतेचा कस लागेल अशा अनेक स्पर्धांत पदके मिळवली होती.
’ठाणेवैभव’शी ऑस्ट्रेलियातून बोलताना त्या म्हणाल्या की, ‘आयर्न-मॅन स्पर्धेत भाग घेण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. फार कठीण अशी ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करण्याची जिद्द मी बाळगली होती. त्यासाठी नियमित पोहणे, धावणे आणि थेट खोपोलीपर्यंत सायकल चालवणे अशी पूर्वतयारी केली होती. काल समुद्रात पोहताना या सरावाचा फायदा झाला. उंच उसळणार्या लाटा आणि तोंडात जाणारे खारे पाणी यामुळे मला दोनदा उलट्याही झाल्या. पण मी निर्धार केला होता.’