भिवंडी : भिवंडी महापालिका प्रशासनाने तब्बल १२ वर्षांनंतर पुन्हा एकदा भटकी कुत्री पकडून त्यांची नसबंदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या कामाचे कंत्राट वेट्स सोसायटी फॉर अँनिमल वेल्फेअर अँड रुरल डेव्हलपमेन्ट,सफिलगुडा, हैद्राबाद यांना दिले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून ही प्रक्रिया जलद गतीने व्हावी,अशी अपेक्षा वाढत आहे.
शहरातील इदगाह रोड येथील महानगरपालिकेच्या स्लॅटर हाऊसमध्ये कंपनीच्या डॉग ऑपरेशन सेंटरचे उद्घाटन महापालिका आयुक्त अजय वैद्य यांच्या हस्ते नुकतेच झाले आहे. महापालिकेने हाती घेतलेल्या या कामामुळे शहरातील कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीला आणि प्रजननास आळा बसेल. त्यामुळे शहरात त्यांच्या संख्येवरही नियंत्रण येणार आहे. या निर्बिजीकरण केंद्रामुळे शहरातील भटक्या व जखमी कुत्र्यांची संख्या आटोक्यात येऊन शहराला याचा चांगल्या प्रकारे लाभ होईल असा विश्वास आयुक्त अजय वैद्य यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
भटक्या कुत्र्यांवर रेबीज प्रतिबंधक लस देणे व निर्बिजीकरण करणे तसेच जखमी श्वानांना पकडून त्यांच्यावर उपचार करण्याचे काम दिले आहे. हैदराबादच्या वेट्स सोसायटी फॉर ॲनिमल वेल्फेअर अँड रुरल डेव्हलपमेंट कंपनीला १४९० रुपये प्रति कुत्रा या दराने हे काम देण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
भिवंडी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या सर्वेनुसार सध्या शहरात १३,६३१ भटकी कुत्री आहेत. त्यांची संख्या इतकी झपाट्याने वाढत आहे. शहराच्या प्रत्येक भागात कुत्रे समूहाने फिरताना दिसत आहेत. शहरातील रिकामे रस्ते आणि छोट्या बोळी हे त्यांचे क्षेत्र बनले आहे. शहरातील हे भटके कुत्रे वर्षभरात १४ हजारांहून अधिक लोकांना चावतात. काही महिन्यांपूर्वी शांतीनगर भागात कुत्रे चावल्याने दोन जणांचा मृत्यू झाला असून शहरालगत शेलार या ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांनी चावून एका मुलाचा जबडा फाडून त्यास गंभीर जखमी केले होते. हे कुत्रे लहान मुलांचा आणि नागरिकांचा पाठलाग करतात. अशावेळी नागरिक स्वत:ला वाचविण्याच्या प्रयत्नात अनेकदा अपघात होऊन त्यांचे हातपाय मोडले असल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये महानगरपालिका विरोधात असंतोष पसरला होता. तसेच कुत्रा चावल्यानंतर रेबीजच्या इंजेक्शनची सोय केवळ शहरातील इंदिरागांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात होती. शहरातील नागरिकांच्या मागणीनंतर महानगरपालिका प्रशासनाने मनपाच्या दवाखान्यात ही सोय केली आहे.
महापालिकेच्या म्हणण्यानुसार कुत्र्यांच्या नसबंदी केंद्रासाठी ३५ लाख रुपये खर्च आला आहे. हैद्राबादच्या या कंपनीने ईदगाह कत्तलखाना येथे एसटीपीच्या मागे श्वान नसबंदी केंद्र बांधले आहे. २८ नोव्हेंबर रोजी दुपारी महापालिका आयुक्त अजय वैद्य यांच्या हस्ते नसबंदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या केंद्रात पशुवैद्यकीय संस्थेने ऑपरेशन थिएटर, रेबीज रूमसह २०० कुत्रे ठेवण्याची व्यवस्था केली आहे. ते तयार करण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च झाले आहेत. व्हेट्स सोसायटीने सध्या १३५ कुत्रे पकडून नसबंदीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी १० जणांची व्हॅन ए टीम बनविलेली आहे, अशी माहिती आरोग्य अधिकारी जी.एम.सोनवणे यांनी दिली.