कळव्यातील महायुतीच्या बुरुजांचा आव्हाडांना हात

चारही मतदारसंघात नजीब मुल्ला यांच्यावर १५ हजार मतांची आघाडी

ठाणे : कळवा प्रभाग समितीमधील महायुतीचे नगरसेवक असलेल्या प्रभागांत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी मताधिक्य घेतले असून चारही प्रभागात त्यांनी बाजी मारल्याचे समोर आले आहे.
कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघात झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. जितेंद्र आव्हाड आणि महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला या गुरू-शिष्यात सामना झाला होता. यात आव्हाडांनी त्यांचा एकेकाळचा खंदा समर्थक असलेले नजीब मुल्ला यांचा तब्बल ९६ हजार मताधिक्य घेऊन पराभव केला होता.

या मतदासंघातील कळवा प्रभाग समितीमधील चार प्रभागांतील सर्वच ठिकाणी आव्हाड यांनी लीड घेतल्याचे दिसून आले आहे. प्रभाग क्र २३ येथे महायुतीचे नगरसेवक आहेत. या प्रभागात आ.आव्हाड यांना ११,०८५ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी नजीब मुल्ला यांना ६७०८ मते मिळाली. या प्रभागात आ. आव्हाड हे ४,३७७ मतांनी पुढे आहेत. प्रभाग क्रमांक २४ मध्ये आ. आव्हाड यांना ११,७८४ मते मिळाली आहेत तर श्री. मुल्ला यांना ९,७५९ मते मिळाली. या प्रभागात आ. आव्हाड यांनी २,०२५ची आघाडी घेतली आहे. प्रभाग क्र. २५मध्ये आ. आव्हाड यांना १३,५६६ मते मिळाली तर श्री.मुल्ला यांना ९,७८४ मते मिळाली. आ आव्हाड यांना येथे श्री. मुल्ला यांच्यापेक्षा ३,७८२ मते जास्त मिळाली आहेत. प्रभाग क्र. ९मध्ये आ. आव्हाड यांना १२,१८७ मते मिळाली तर श्री. मुल्ला यांना ७,०३९ मते मिळाली. आ आव्हाड यांना या प्रभागात ५,१४८ मतांची आघाडी मिळाली आहे.

कळवा प्रभाग समितीमध्ये आ. आव्हाड यांना एकूण ४८,६२२ मते मिळाली आहेत तर त्यांचे प्रतिस्पर्धी श्री.मुल्ला यांना एकूण ३३,२९० मते मिळाली आहेत. या प्रभात समिती क्षेत्रात आ.आव्हाड यांना १५,३३२ इतके मताधिक्य मिळाले आहे.
आ. आव्हाड यांनी कळवा-मुंब्रा या मतदारसंघात मागिल १५ वर्षांत अनेक विकासकामे केली आहेत. या भागातील सर्व रस्ते काँक्रीटचे आहेत, प्रशस्त रस्ते, कळवा रेल्वे स्टेशन परिसरातील सुधारणा, कळवा पूर्व पश्चिम उड्डाण पूल, खारीगाव येथून थेट कळवा स्टेशनला जाणारा रस्ता अशी विकासकामे श्री.आव्हाड यांनी केली आहेत. या भागाचा सर्वांगीण विकास आ.आव्हाड यांनी केला आहे, त्यामुळेच या कळवा प्रभाग समितीमधील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांनी त्यांना पाठिंबा दिला होता, असे ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांनी सांगितले.