निवडणुकीत वसुली थंडावली; ठामपावर दात कोरण्याची पाळी!

तिजोरीत उरला एक महिन्याचा पगार

ठाणे : ठाणे महापालिकेच्या सेवेत ५१८४ अधिकारी कर्मचारी असून महिन्याकाठी १२० कोटी रुपये पगारासाठी खर्च होतात. पण सध्या पालिकेच्या तिजोरीत अवघे ९५ कोटी रुपये असल्याची बाब पुढे येत आहे. त्यामुळे या महिन्यात पगार कसा द्यावा, अशी चिंता प्रशासनाला सतावत आहे.

ठाणे महापालिकेच्या सेवेत एकूण ५१८४ अधिकारी आणि कर्मचारी आहेत. त्यामध्ये कर्मचाऱ्यांचे पगार, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन आणि टीएमटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दरमहिना १२० कोटी रूपये खर्च केला जातो. ठाणे महापालिकेच्या तिजोरीत अवघे ९५ कोटी २५ लाख रुपये शिल्लक आहेत. तर केंद्र सरकारकडून जीएसटी स्वरूपात दरमहिना ९४ कोटी रुपये येतात. मात्र हे पैसे फक्त कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च होत असून पाणीपट्टी, घरपट्टी तसेच शहर विकासाच्या उत्पन्नावर पालिकेची आर्थिक भिस्त आहे. त्यामुळे आता थंडावलेली वसुली मोहीम अधिक व्यापक प्रमाणात सुरू करण्यात येणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत ठाणे महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त होते. निवडणुकीत ठाणे महापालिकेचे जवळपास ३,५०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जुंपले होते. त्यामुळे प्रशासनाची वसूली मोहीम थंडावली असल्याने त्याचा परिणाम पालिकेच्या तिजोरीवर झाला असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

कोरोनानंतर तिजोरी रसातळाला गेल्यामुळे ठाणे महापालिकेच्या डोक्यावर ठेकेदारांच्या बिलांचा भार आहे. आतापर्यंत मार्च २०२३ पर्यंतची ठेकेदारांची सर्व बिले देण्यात आली असली तरी त्यानंतरची करोडो रुपयांची बिले पालिका आयुक्तांच्या टेबलवर पडून आहेत.

पालिका हद्दीतील दिव्यांग बांधवांना दरवर्षी अनुदान दिले जाते.
जवळपास १२ हजार दिव्यांगांचे २९ कोटी रुपये देणे बाकी आहेत. गणपती गेले, दसरा गेला, दिवाळी झाली, निवडणुकाही झाल्या. आता तरी आमच्या हक्काचे पैसे द्या. अन्यथा जोरदार आंदोलन करणार असा इशारा दिव्यांग बांधवांच्या संघटनांकडून देण्यात आला आहे.