बोगस आयएसआय मार्क लावून पाण्याचे जार विक्री

कोपरखैरणेत कंपनीवर बीआयएसची छापेमारी

नवी मुंबई : कोपरखैरणे येथे आयएसआय मार्कचा गैरवापर करणाऱ्या पाण्याच्या कारखान्यावर बीआयएसच्या अधिकाऱ्यांकडून छापेमारी करण्यात आली.

परवाना नसताना आयएसआय मार्क वापरून या कारखान्यातून अवैधपणे पाणी विक्री सुरू होती. याबाबतची माहिती मुंबईतील बीआयएसच्या अधिकाऱ्यांना लागली होती. त्यानुसार बुधवारी दुपारी छापेमारी करण्यात आली. कोपरखैरणे सेक्टर २ येथे असलेल्या मेसर्स अंजिता एंटरप्राइजेज असे या कारखान्याचे नाव आहे. बीएसआय पथकाचे प्रमुख अर्जुन आर्यन यांनी त्यांच्या पथकासह छापेमारी केली.

ही कंपनी कोणतेही परवाने नसताना बनावट आयएसआय मार्क असलेले पाण्याचे जार विक्री करत होती. मोठ्या प्रमाणात जार जप्त करण्यात आल्या. त्यांना दंड ठोठावण्यात आला असल्याचे अर्जुन आर्यन यांनी सांगितले. कोणताही परवाना नसताना आयएसआय मार्क वापरणे गुन्हा असून त्यासाठी दंड आकारण्याची कारवाई करण्यात येते असे अर्जुन आर्यन म्हणाले. यावेळी कोपरखैरणे पोलिसांची साथ मिळाली.