महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरून निर्माण झालेली उत्कंठा बुधवारी श्री. एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत संपवतील ही शक्यता मावळली आहे. त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेंडू मोदी-शाह यांच्या कोर्टात ढकलला आहे. अर्थात तसे करताना त्यांनी भाजपाच्या नेतृत्वाला अडचणीत आणण्याऐवजी सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन वाट मोकळी करून दिली आहे. किंबहुना प्रचलित राजकारणात इतकी प्रांजळ भूमिका मांडणे अशक्यप्राय बाब समजली जात असताना मोदी-शाह यांच्यावरच शिंदे यांनी सन्माननीय तोडगा देण्याचा निर्णय सोपवला आहे. युती टिकावी अशी शिंदे यांची इच्छा यातून व्यक्त तर झालीच, परंतु युतीधर्माला साजेसे वागले पाहिजे हे भाजपाला क्रमप्राप्त झाले आहे. शिंदे यांच्या खेळीमुळे ते निश्चितच राजकीयदृष्ट्या मुत्सद्दी आणि मोठे झाले आहेत. त्यांच्या अशा परिपक्वतेची राज्यातील राजकारणाला सवय राहिली नसल्यामुळे आम जनतेला त्याचे कौतुक वाटले नाही तरच नवल!
श्री. शिंदे यांच्यासमोर अनेक विकल्प ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. सर्वप्रथम उपमुख्यमंत्री पद, ते मान्य नसेल तर केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश किंवा त्यांच्या पसंतीचा उपमुख्यमंत्री. केंद्रीय मंत्रिपद श्री. शिंदे स्वीकारतील असे वाटत नाही. त्यामागे अनेक कारणे आहेत. शिंदे यांना निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. असली-नकलीचा फैसला झाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. या ऊर्जेचा वापर संघटनात्मक बांधणीसाठी तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांत सत्ता स्थापन करण्यासाठी होईल. श्री. शिंदे केंद्रात गेले तर त्यांची पक्षावर पकड सैल होऊ शकते. त्यामुळे आम्हाला ते केंद्रीय मंत्रीपद घेतील असे वाटत नाही.
उपमुख्यमंत्रीपद घेणे म्हणजे एक पायरी खाली उतरण्यासारखे होईल. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी ही तडजोड केली होती तर शिंदेही युती टिकवण्यासाठी हा निर्णय घेऊ शकतात. अर्थात त्यांना खाती ठरवण्याचा अधिकार अधिक द्यावा लागेल.
फडणवीस-शिंदे-अजित पवार यांच्यात जो सहकार्याचा अलिखित करार आहे त्यास बाधा पोहोचणार नाही, अशी रचना भाजपाच्या शिर्षस्थ नेत्यांना करावी लागणार आहे. श्री. शिंदे यांचे मोदी-शाह यांच्याबरोबर असलेले संबंध सौहार्दाचे राहिले असून ही बाब लक्षात घेऊन शिंदे यांचा योग्य सन्मान राखला जाईल असे वाटते. एक प्रकारे श्री. शिंदे यांनी मोदी-शाह आणि संघ परिवाराला जिंकून त्यांच्या व्यक्तीगत आणि शिवसेनेच्या उज्ज्वल भवितव्याची पायाभरणी केली आहे.