ठाणे : मुंबईपाठोपाठ ठाणे पोलिस आयुक्तालंय परिसरात दुचाकीवर पाठीमागे बसणाऱ्यालाही हेल्मेट सक्तीचे करण्यात आले असून हेल्मेट परिधान न करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दुचाकी चालवणाऱ्या आणि पाठीमागे बसणाऱ्यांना हेल्मेट परिधान करणे सक्तीचे केले आहे तरी देखील अनेक दुचाकीस्वार हे विनाहेल्मेट गाडी चालवत आहेत, त्यामुळे अपघातात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होत आहे. दुचाकी चालवणाऱ्यापेक्षा पाठीमागे बसणाऱ्याचे अपघातात मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. वाहतूक पोलिस विनाहेल्मेट गाडी चालवणाऱ्याच्या विरोधात कारवाई करतात परंतु पाठीमागे विनाहेल्मेट बसणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जात नसल्याचे पोलिस प्रशासनाच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे २५ नोव्हेंबर रोजी वाहतूक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक विभागाचे पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांनी परिपत्रक काढून ठाणे, ठाणे ग्रामिण या भागात दुचाकी स्वार आणि त्यांच्या पाठीमागे बसणाऱ्यालाही हेल्मेट सक्ती केली आहे. विना हेल्मेट दुचाकी चालवणारे आणि पाठीमागे बसणारे या दोघांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे मुंबईपाठोपाठ ठाण्यात देखील पाठीमागे बसणाऱ्याला विना हेल्मेट प्रवास करता येणार नाही.
हा निर्णय जुनाच असून त्याची अंमलबजावणी ठाणे शहरात केली जात नव्हती. यापुढे ती कठोरपणे केली जाईल, असे एका अधिकाऱ्याने ‘ठाणेवैभव’ला सांगितले.