भाजपचा ठामपावर डोळा; स्वबळावर लढण्याचे संकेत

ठाणे: जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील भाजपाची संघटना मजबूत करण्यासाठी आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे नवनिर्वाचित आमदार संजय केळकर यांनी दिले आहेत.

वसंत विहार येथिल मंदिरात जानकादेवीचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आ.केळकर यांनी आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले.

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील भाजपा नऊ जागांवर लढली होती, त्या सर्व जागा भाजपाने जिंकल्या आहेत. त्यामुळे भाजपाचा जिल्ह्यात १००टक्के स्ट्राईक रेट झाला आहे तर शिंदे गटाने सात जागा लढविल्या होत्या, परंतु त्यांचे सहाच आमदार निवडून आले आहेत. त्यांचा स्ट्राईक रेट भाजपापेक्षा कमी आहे. या निवडणुकीत भाजपाच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्या जोरावर पक्षाची संघटना मजबूत करून पक्षाची ताकद वाढवायची आहे. त्या दृष्टीने पक्षाची वाटचाल सुरु झाली आहे.

जिल्ह्यात ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, आणि भिवंडी या सहा महापालिका आहेत. त्यापैकी नवी मुंबई आणि मीरारोड या महापालिकांत भाजपाचा महापौर होता, कल्याण-डोंबिवलीमध्ये युतीची सत्ता होती, परंतु ठाणे महापालिकेत भाजपाचा महापौर झाला नाही त्यामुळे ठामपामध्ये भाजपाचा महापौर बसविणे हे आपले उदिष्ट असल्याचे आमदार केळकर म्हणाले. आम्हाला न भूतो न भविष्यति असे यश मिळाले आहे, त्यामुळे ठाणे महापालिका हद्दीतील भाजपाची संघटना मजबूत करणे, भाजपाच्या जागा वाढविणे यासाठी एकत्रित बसून निर्णय घेतला जाईल, असे श्री. केळकर म्हणाले.