अंबरनाथ : निवडणुका झाल्या मतमोजणी झाली, नवे सरकार बनवण्यासाठी राजधानीत जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत, असे असले तरी मात्र अंबरनाथच्या एका शाळेत मतमोजणीच्या दिवशी झालेल्या कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून त्यातून दुर्गंधी येऊ लागली आहे. कचरा उचलणार कधी असा सवाल उपस्थित होत आहे. तीन दिवस होऊनही कचरा न उचलल्याने तीव्र नापसंती व्यक्त होत आहे.
अंबरनाथ विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी येथील महात्मा गांधी शाळेमध्ये निवडणूक यंत्रणेकडून व्यवस्था करण्यात आली होती, निवडणूक अधिकारी-कर्मचारी, पोलीस अधिकारी असा ताफा सज्ज करण्यात आला होता. त्यांच्यासाठी जेवण, नाष्ट्याची सोय करण्यात आली होती. मागील सुमारे एक महिन्यापासून शाळा मतदान यंत्रणेसाठी ताब्यात घेण्यात आली होती. दिवाळीच्या सुट्टीनंतर 9 नोव्हेंबरनंतर शाळा सुरू झाली होती.
शाळेमध्ये शनिवार २४ नोव्हेम्बर रोजी मतमोजणी करण्यात आली. यावेळी जेवणासाठी वापरलेल्या प्लॅस्टिकच्या डिश, प्लास्टिक ग्लास यांचा खच पडला आहे. त्यातून दुर्गंधी येत आहे, त्याचा त्रास शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांना जाणवू लागला आहे. मतमोजणी होणार असल्याने शाळेला त्याआधी सुट्टी देण्यात आली होती. आता सोमवार २५ नोव्हेम्बरपासून शाळा नियमित सुरु झाली आहे. असे असले तरी तीन दिवस असूनही कचऱ्याचा ढिगारा पडून आहे. मतमोजणीसाठी लागणारे मंडप आदी साहित्य काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कचरा पडल्याने खेळायचे कुठे, असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.