म्हाडाच्या कोकण मंडळाची सोडत लांबणीवर

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाने २,२६४ घरांच्या सोडतीसाठी अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू केली असून त्याला इच्छुक अर्जदारांकडून अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला आहे.

११ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर दरम्यान २,२६४ घरांसाठी अनामत रक्कमेसाठी केवळ २,५१४ अर्ज दाखल झाले आहेत. अत्यल्प प्रतिसादामुळे कोकण मंडळाची चिंता वाढली असून आता अर्ज विक्री-स्वीकृतीस मुदतवाढ देण्याची नामुष्की मंडळावर आली आहे. त्यानुसार लवकरच मुदतवाढीची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. मुदतवाढ दिल्यास २७ डिसेंबर रोजी काढण्यात येणारी सोडत लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.

कोकण मंडळाच्या घरांच्या विक्रीचा प्रश्न गंभीर बनला आहे. मुंबईतील घरांना प्रचंड प्रतिसाद मिळत असताना कोकण मंडळाची घरेच विकलीच जात नसल्याचे चित्र आहे. रिक्त घरे विकण्यासाठी मंडळाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. मात्र या घरांची विक्रीच होत नाही. रिक्त घरांच्या विक्रीची चिंता असतानाच आता मंडळाच्या सर्वसाधारण सोडतीतील घरांकडेही इच्छुकांनी पाठ फिरविली आहे. कोकण मंडळातील २,२६४ घरांच्या विक्रीसाठी ११ ऑक्टोबरपासून अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया सुरू होऊन ४० दिवस पूर्ण झाले, तरी या प्रक्रियेला प्रतिसादच मिळताना दिसत नाही.

११ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबरदरम्यान २,२६४ घरांसाठी ८,३५९ जणांनी अर्ज भरले आहेत. पण यातील केवळ २,५१४ जणांनीच अनामत रक्कमेचा भरणा करून प्रत्यक्षात अर्ज दाखल केले आहेत. ही संख्या खूपच कमी असून आता अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रिया संपुष्टात येण्यासाठी केवळ १५ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. अर्ज विक्रीची मुदत १० डिसेंबरला, तर अनामत रक्कमेसह अर्ज दाखल करण्याची मुदत १२ डिसेंबरला संपणार आहे. आतापर्यंतचा प्रतिसाद पाहता पुढील १५ दिवसांत अर्जांच्या संख्येत वाढ होण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे कोकण मंडळाची अडचण वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर आता अर्ज विक्री-स्वीकृतीस मुदतवाढ देण्याचा निर्णय मंडळाने घेतल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. यासंबंधीचा अंतिम निर्णय लवकरच जाहीर केला जाणार आहे. अर्ज विक्री-स्वीकृतीस मुदतवाढ दिल्यास २७ डिसेंबरची सोडत लांबणीवर पडणार आहे. दरम्यान, सोडतीला प्रतिसाद मिळावा यासाठी यासंदर्भात विविध माध्यमातून जाहिरात केली जाण्याचीही शक्यता आहे. सोडतीतील घरांची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचवली जाण्यासाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे.