अपक्ष-बंडखोरांची चाल; कुठे वार तर कुठे ढाल !

जिल्ह्यात सात टक्के मिळवली मते

ठाणे : निवडणुकांमध्ये उमेदवारांना पराभूत करण्यासाठी रिंगणात उतरलेल्या अपक्ष आणि बंडखोरांना अपेक्षित यश मिळाले नाही. जिल्ह्यात या उमेदवारांना सात टक्के मतांपुढे जाता आले नाही तर अनेकांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. मात्र काही ठिकाणी इतरांना याचा फायदा झाला तर काही थोडक्यात पराभूत झाले.

जिल्ह्यात २०१९ साली निवडून आलेल्या एकमेव अपक्ष आमदारालाही यंदाच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर दुसरीकडे बंडखोरी करणारा एखाद-दुसरा अपवाद वगळता सर्वच उमेदवारांना मतदारांनी नाकारल्याचे दिसते.
महायुती विरुद्ध महाविकास आघाडी या लढतीमध्ये मनसेचे इंजीन जोडले गेल्यामुळे जिल्ह्यातील १८ पैकी १४ विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यात ११ बंडोबांसह ११३ अपक्षही रिंगणात उतरले. अनेक छोट्या-मोठया पक्षांनीही उमेदवार उभे कल्यामुळे १८ विधानसभांसाठी तब्बल २४४ उमेदवार आपले नशिब आजमवण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. त्यापैकी आयत्यावेळी तीन ते चार बंडखोरांनी आपली तलवार म्यान केली. मात्र तरीही अपक्ष व बंडखोरांची डोकेदुखी कायम होती. त्यातही काही बंडखोर विजयाच्या दिशेने झेप घेतील अशी परिस्थिती निर्माण झाली. काही अपवाद वगळले तर उर्वरित बंडखोरांना मतदारांनी सपशेल नाकारल्याचे यंदाच्या निवडणुकीत दिसून आले.

अपक्षांना उभे करून मतांचे विभाजन करण्याची खेळीही अयशस्वी ठरली असल्याचेही त्यांना पडलेल्या मतांवरून दिसून येते ठाणे, डोंबिवली येथे सर्वात कमी तर सहा मतदारसंघांमध्ये सर्वाधिक अपक्ष उमेदवारांची जत्रा भरली होती. ११ विधानसभांमध्ये बंडखोरी झाली होती. त्यामुळे मतांचे विभाजन होऊन नुकसान होणार याची धाकधूक प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना होती. ही भीती काही अंशी खरीही ठरली आहे. ऐरोली, बेलापूर, भिवंडी पश्चिम, कल्याण पूर्व या मतदारसंघामध्ये बंडखोरांनी दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकाची मते मिळवली आहेत.
शहापूरमध्ये जिजाऊ संघटनेने अपक्ष महिला उमेदवार मैदानात उतरवला होता. त्यांनी ४२ हजाराहून अधिक मते घेतल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले. महायुतीचे दौलत दरोडा यांचा निसटता विजय झाला. पण इतर ठिकाणी बंडखोरांना फारसे यश आले नसल्याचे दिसते. अपक्षांची स्थिती तर त्याहून बिकट झाली. २०१९ साली मीरा-भाईंदरमधून अपक्ष उमेदवार गीता जैन निवडून आल्या होत्या. त्यांना या निवडणुकीत पराभवाचा केवळ सामना करावा लागला नाही तर जेमतेम २३ हजारांपर्यंतच मजल मारता आली.
भिवंडी ग्रामीण मतदारसंघात भाजप बंडखोर मनीषा ठाकरे यांनी २४,३०४ मते मिळवली. शहापूरमध्ये महाविकास आघाडीचे पांडूरंग बरोरा यांना काही हजार मतांसाठी पराभवाला सामोरे जावे लागले. येथे जिजाऊ पुरस़्कत रंजना उघडा यांनी तब्बल ४२,७७६ मते मिळवली. भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात काँग्रेस बंडखोर विलास पाटील १३,५७९ मते घेऊन ते तिसर्‍या क्रमांकावर होते. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजप बंडखोर वरुण पाटील यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली. तरीही त्यांना १६७ मते पडलीच. मुरबाड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बंडखोर शैलेश वडनेरे उभे ठाकले. पण त्यांना २२५२ मतांवर समाधान मानावे लागले. दुसरीकडे महाविकास अघाडीचे सुभाष पवार यांच्या नामसाधर्म्य असलेले अपक्ष उमेदवार सुभाष पवार यांना ३५१० मते मिळाली. अंबरनाथमध्ये मात्र नामसाधर्म्य असलेल्या राजेश वानखेडे यांना केवळ ६४४ मते मिळवता आली. उल्हासनगर मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार भारत गंगोत्री यांना १८२१ मते मिळाली.

कल्याण पूर्व, ऐरोली, बेलापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोरांना आपल्या पारड्यात ५० हजाराहून अधिक मते खेचण्यात यश आल्याचे दिसते. कल्याण पूर्वेत महेश गायकवाड यांनी ५५,१०८ मते मिळवली. ऐरोलीत विजय चौगुले यांनी ५२,३८१ मते मिळवली तर बेलापूरमध्ये विजय नाहटा यांना मात्र १९,६४६ मतांवर समाधान मानावे लागले. नामसाधर्म्य असलेले अपक्ष उमेदवार संदिप नाईक यांना ५१३ तर तर अपक्ष मंदा म्हात्रे यांना ५५७ मते मिळाली.

कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस बंडखोर मनोज शिंदे यांना नोटापेक्षाही कमी मते मिळाली. या मतदारसंघात २६७६ नोटा तर शिंदे यांना अवघी १६५३ मते मिळाली.