ज्यांचा पराभव होतो ते त्याचा स्वीकार करून आत्मचिंतनाची भाषा बोलू लागतात. तसा विचार महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये सुरू असेल तर नवल नाही. अर्थात अशा आत्मचिंतनाची पहिली पायरी असते जनतेने दिलेल्या कौलाचा आदर करणे. महाविकास आघाडीच्या बड्या नेत्यांनी पराभवाच्या बातम्या येऊ लागताच मात्र संशय, संताप आणि चिडचिड व्यक्त केली. राजकारणी असले तरी ती माणसेच असतात. त्यामुळे अनपेक्षित अशा निकालामुळे काही काळ त्यांचे संतुलन बिघडू शकते. संवेदनेच्या पातळीवर विचार करता आपण या स्वाभाविक प्रक्रियेचा स्वीकार करायला हवा. अर्थात ही विषण्णता फार काळ टिकणे चांगले नाही, कारण त्यामुळे कार्यकर्त्यांचे खच्चीकरण झपाट्याने होऊ लागते. चिंतनाची भाषा करूनच कार्यकर्त्यांना धीर देणे आणि पुढील रूपरेषा ठरवणे हे परिपक्व राजकारणाचे लक्षण ठरू शकेल. महाविकास आघाडीने उतू गेलेल्या दुधावर फार काळ रडत बसणे नजीकच्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने चांगले नाही.
पराभवाचे चिंतन जसे गरजेचे आहे तसे विजयाचे सिंहावलोकन होणेही तितकेच आवश्यक आहे. मतदानोत्तर चाचण्या नेहमीप्रमाणे सपशेल तोंडावर आपटल्या असताना आणि महायुतीमधील घटक पक्षांनीही असे घवघवीत यश मिळणे अपेक्षित नव्हते, अशी प्रांजळ कबुली देणे विजयोत्सवाबरोबर यशाची कारणमीमांसा खरे तर करायला हवी. ज्या बाबी निवडणूक नियोजन आणि व्यूहरचनेतून गळाल्या असतील आणि ज्यामुळे हे मोठे यश पदरी पडले असेल तर त्यात त्यांची नोंद घेणे भविष्यातील निवडणुकांसाठी उपयुक्त विदा (डेटा) ठरू शकेल.
या निकालावर महाविकास आघाडी सातत्याने शंका व्यक्त करीत आहे. अर्थात ‘ईव्हीएम’वर नेहमीप्रमाणे खापर फोडले गेलेले नाही. ही सबब पुढे करून मुख्य कारणमिमांसेला चाट देण्याचा प्रकार आघाडीचे नेते टाळत असतील तर ती जमेची बाजू ठरावी. ही निवडणूक महाराष्ट्राच्या इतिहासात कायम लक्षात ठेवली जाणार यात वाद नाही. मतदानाचा वाढलेला टक्का त्यातही प्रामुख्याने महिला मतदारांचा प्रतिसाद ही बाब गेम चेंजर ठरली. लोकसभा निवडणुकीत झालेले मतांचे ध्रुवीकरण या खेपेत नगण्य असणे हा महायुतीच्या रणनीतीचा भाग असला तरी जाती-धर्माच्या कचाट्यात लोकशाही अडकणे चांगले नाही. हे शहाणपण मतदारांमध्ये आले असाही अर्थ निघतो. या निवडणुकीत मतदारांनी अनेक मतदारसंघात दिग्गज नेत्यांना धूळ चारून नवीन चेहऱ्यांना वाव दिला आहे तर घराणेशाही स्वीकारताना अथवा नाकारताना काही विचार केलेला दिसतो. मतदारांना गृहीत धरणाऱ्या विद्यमान आमदार तसेच काही मंत्र्यांना घरी पाठवून लोकशाहीची थट्टा करून नका असा सज्जड दमही दिला आहे. इलेक्ट्रॉनिक प्रणालीचा वापर करून आधुनिकतेचा स्वीकार या निवडणुकीत दिसलाच, पण त्याचबरोबर मतदारांच्या घरापर्यंत पोहोचण्याची पारंपारिक पद्धत ज्या उमेदवारांनी स्वीकारली त्यांना मतदारांनी पसंती दिल्याचे दिसते.
या निवडणुकीत एक अत्यंत गंभीर बाब घडली आणि ती होती पैशांचा प्रचंड वापर. भारतीय निवडणूक व्यवस्था पैसा, बळ धर्माच्या आधारे ध्रुवीकरण, गुन्हेगारीकरण या पैशातून मुक्त होऊन विकासाची वाट चोखाळेल या आशेवर असणाऱ्या मतदारांना पैशांचा बेसुमार वापर निश्चितच खटकणारा होता. निवडणूक विजयाला त्यामुळे गालबोट लागत असेल तर सर्वच पक्षांनी त्याचा गांभीर्याने विचार करायला हवा.
या निवडणुकांमुळे निर्विवाद सत्ता मिळाली आहे. त्यामुळे राजकीय उलथा-पालथ होण्याची शक्यता नाही. स्थिर सरकारची ती नांदी आहे. परंतु सरकार म्हणजे केवळ सत्तारूढ पक्ष नव्हे तर तितकाच सक्षम विरोधी पक्षही. कोणत्याच विरोधी पक्षाला निर्धारित किमान 29 जागा न मिळाल्याने विपक्ष बाक रिकामे राहण्याची स्थिती निर्माण झाली आहे. लोकशाही संकेतांना ही बाब मारक आहे. त्यामुळे सत्तारूढ पक्षावर सुशासन आणि पारदर्शक व्यवहार करण्याचे उत्तरदायित्व प्रामाणिकपणे निभवावे लागणार आहे. निर्विवाद बहुमताचे फायदे असतात तसे हे तोटेही नजरेआड करून चालणार नाहीत.
नवीन सरकार विजयाचा उपयोग लोकहितासाठी करील हीच अपेक्षा. विजयाचा उन्माद फार काळ राहणे व्यापक हिताला बाधा आणू शकते. नवीन आमदार त्यांना मिळालेला कौल अधिक जबाबदारीने स्वीकारतील हीच आशा.