शिंदे सरनाईक लाखाच्या मताधिक्याने होणार विजयी?

अभ्यासक आणि कार्यकर्त्यांचे मत

ठाणे : कोपरी-पाचपाखडीमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे प्रताप सरनाईक एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळवून विजय संपादन करणार, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कोपरी-पाचपाखडी मतदार संघातून पाचव्यांदा मुख्यमंत्री श्री.शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या मतदार संघातून महाविकास आघाडीने ठाकरे गटाचे केदार दिघे यांना रणांगणात उतरवले आहे. मनसेने आपला उमेदवार दिला नाही. ही जागा काँग्रेसला सोडण्यात न आल्याने काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी मनोज शिंदे यांनी बंडाखोरी केली आहे. हा मतदार संघ ठाणे पूर्व आणि वागळेचा परिसर असा तयार करण्यात आला आहे. या मतदारसंघात तीन लाख ३८,३२० मतदार आहेत. काल या मतदारसंघातील ५९.०१ टक्के इतके मतदान झाले होते. मागिल वेळी या मतदारसंघात ५०.९५ टक्के इतके मतदान झाले होते. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना एक लाख १३,४९७ इतकी मते मिळाली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे संजय घाडीगावकर यांना २४,१९७ इतकी मते मिळाली होती. श्री.शिंदे यांनी ८९ हजारपेक्षा जास्त मताधिक्य मिळवले होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना टक्कर देणारा उमेदवार महाविकास आघाडीने दिला नाही. मनसेने उमेदवार उभा केला नाही तसेच त्यांना मागिल चार निवडणुकीचा अनुभव आहे. त्याचबरोबर त्यांचा मतदारांबरोबरचा संवाद त्यांनी कायम ठेवला आहे. संघटनेचे काम त्यांच्या पाठीशी आहे. ह्या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत तर त्यांचे प्रतिस्पर्धी श्री. केदार दिघे हे स्व.आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. त्यांचा या मतदार संघाशी तसा संबंध नाहीच, त्यांचे कार्य देखिल नाही. त्यांच्या पाठीशी संघटनेचे भक्कम बळ नाही. त्याचबरोबर महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. त्याचा परिणाम त्यांच्या मतांवर होऊन ही निवडणूक एकतर्फी होऊन मुख्यमंत्री श्री. शिंदे हे एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य घेऊन विजयाची पताका पाचव्यांदा फडकविणार लावणार आहेत.

ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघ जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार असलेला मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ घोडबंदरचा काही भाग आणि मीरारोडचा काही भाग मिळून हा मतदारसंघ तयार करण्यात आला आहे. या मतदारसंघात पाच लाख ४०,२९३ इतके मतदार आहेत. या मतदारसंघात महायुतीतर्फे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार प्रताप सरनाईक हे चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांचा सामना महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक नरेश मणेरा आणि मनसेचे संदिप पाचंगे यांच्याशी होणार आहे. मागिल निवडणुकीत या मतदारसंघात ४६.८३ टक्के इतके मतदान झाले होते. आ.श्री.सरनाईक यांना एक लाख १७,५९३ इतकी मते मिळाली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांना ३३,५८५ इतकी मते मिळाली होती. श्री. सरनाईक यांनी ८४,००८ इतके मताधिक्य मिळाले होते. यावेळी या मतदारसंघात सुमारे सहा टक्के मतदान वाढले आहे. वाढलेले मतदान हे महायुतीलाच मिळेल असा दावा आ. सरनाईक यांच्या समर्थकांचा आहे. या मतदार संघात आ.सरनाईक यांनी मागिल पाच वर्षांत विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर केली आहेत. त्यांना मागिल तीन निवडणुकीचा अनुभव आहे. कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्या पाठीशी आहे. मतदारांना त्यांच्याबद्दल विश्वास असल्याने श्री. सरनाईक हे एक लाखापेक्षा जास्त मते घेऊन विजयी होतील, असा विश्वास त्यांच्या पाठीरख्यांनी केला आहे. श्री.मणेरा हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. पक्ष फु्टीमुळे मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते राहिले नाहीत. आगरी-कोळी समाज आणि ते ज्या भागाचे महापालिकेत प्रतिनिधित्व करतात त्या भागातील मतदार आणि सेनेचे निष्ठावंत ही त्यांच्या जमेची बाजू असून तेच निवडून येतील असे त्यांचे समर्थक दावा करत आहेत. त्यामुळे कोण, किती मताधिक्य घेते हे २३ तारखेला स्पष्ट होणार आहे.