मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
बदलापूर: विधानसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी मतदान कमी झाले असेल त्या ठिकाणी पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी दिली जाणार नाही, अशी तंबी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूरमध्ये इच्छुक नगरसेवकांना दिली.
बदलापूरमध्ये युतीमधील वाद मिटवून घ्यावेत, त्याचे पडसाद निवडणुकीत उमटायला नकोत. मतदारसंघात तुतारी, पिपाण्याचे आवाज आले नाही पाहिजेत, असे आवाहन देखील त्यांनी केले.
बदलापूर येथे महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. गेल्या २० वर्षांपासून मुरबाड मतदारसंघात विकास कामे केली आहेत. गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत तर भरघोस निधी मतदारसंघात आणल्याचे उमेदवार कथोरे यांनी सांगितले, मात्र बदलापुरातील शिवसेनेतील दुफळीचा त्रास होत असल्याचे व्यथा किसन कथोरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर मांडली. बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यात वाद आहेत, ते समोरासमोर बसवून मिटवून टाकावेत, असा सल्ला मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हात्रे आणि कथोरे यांना दिला.
विधानसभा निवडणुकीपाठोपाठ महानगरपालिकांच्या निवडणुका होणार असल्याचे सूतोवाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ज्या ठिकाणी मतदान कमी होईल त्या ठिकाणच्या उमेदवाराला उमेदवाराला उमेदवारी मिळणार नाही अशी तंबी मुख्यमंत्र्यानी दिली तसेच याबाबत उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही सांगणार असल्याचे ते म्हणाले. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येण्यासाठी विविध योजना रराबवल्या आहेत. त्यामुळे बेईमानी कोणत्याही परिस्थितीमध्ये खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला.
किसन कथोरे यांनी मुरबाडमधून काँग्रेसला हद्दपार केलं’ अडीच वर्षात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केले’ आता हे बंद करू ते बंद करू अशा धमक्या देत आहेत. तुमच्या आघाडीतही तुमचा चेहरा चालत नाही’ ‘मग महाराष्ट्राला कसा चालेल?’ आम्ही विकासासाठी दिल्लीत जातो, मुख्यमंत्रीपद मागायला जात नाही असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
या दाढीने तुमची गाडी खड्ड्यात घातली’ कोव्हिड-कोव्हिड करून घरात बसून राहिले ‘ कोमट पाणी प्या, मास्क लावा’ अश्या शब्दात मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंची नक्कल केली. ‘ सगळे एक आहोत’ वामन म्हात्रे किसन कथोरे उयांचे काम करतील असे स्पष्ट जाहीर केले. गौरी सभागृहात झालेल्या सभेत महायुतीचे प्रमोद हिंदुराव, आशिष दामले, कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील, राम पातकर, एकनाथ शेलार, राजन घोरपडे, शरद तेली, संभाजी शिंदे, रुचिता घोरपडे आदींची यावेळी भाषणे झाली.