नवी मुंबई : राज्यातील होणाऱ्या विधानसभा निवडणूक मतदानानिमित्ताने वाशीतील एपीएमसी बाजार समितीतील चार बाजार पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र भाजीपाला बाजार सुरू राहणार आहे.
मतदानानिमित्ताने सर्व नोकरदार वर्गांना मतदानाची सुट्टी दिली जाते. त्याचप्रमाणे एपीएमसी बाजार समितीत देखील मोठ्या प्रमाणात माथाडी वर्ग, व्यापारी व इतर बाजारघटक आहेत. त्यामुळे बुधवारी एपीएमसी बाजारातील चार बाजार बंद तर जीवनावश्यक वस्तू असणारे भाजीपाला बाजार सुरू राहणार आहे.
एपीएमसीतील बहुतांशी माथाडी कामगार हा सातारा, सांगली, कराड, पुणे या विभागातील आहेत. आजही कित्येक माथाडी कामगार त्यांच्या मूळगावीच मतदानाचा हक्क बजावत असतात. येथील बहुतांशी माथाडी कामगार मतदान करण्यासाठी गावी जातात. त्यामुळे या बाजारातील घटकांना मतदान करता यावे याकरीता कांदा, बटाटा, फळ, धान्य आणि मसाला बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. तर दुसरीकडे जीवनावश्यक वस्तू भाजीपाला बाजार मात्र सकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे, अशी माहिती एपीएमसी प्रशासनाने दिली आहे.