ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या . प्रचारासाठी अवघे काही तास हातात असतानाच शेवटच्या रविवारचा बोनस मिळाल्याने सर्वच उमेदवार कार्यकर्त्यांसह आज रस्त्यावर उतरलेले दिसले.
बाईक रॅली, भव्य मिरवणुका, घरोघरी गाठीभेटीवर उमेदवारांनी आज भर दिला तसेच गल्लीबोळात फिरणार्या प्रचार गाड्यांनी वेग घेतला. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत असून मतदानाआधीचा शेवटचा रविवार हा महारविवार ठरला.
विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्व १८ मतदारसंघांमध्ये महायुती विरुद्ध महायुती असा सामना रंगला आहे. दोन्ही युती, आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून एकमेकांना जबरदस्त टक्कर देत आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात पत्रकार परिषदा, चौकसभा, मेळावे घेतल्यानंतर दुसर्या टप्प्यात कार्यकत्यांची मोठी फळी रस्त्यावर उतरवण्यात आली. उमेदवार आपापल्या प्रमुख नेते आणि स्टारप्रचारकांसह मिवणुका काढताना दिसले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, सुषमा अंधारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा जिल्ह्यात गाजल्या. त्यामुळे राजकीय वातावरणही तापले आहे.
जाहिरनामा, वचननामा घराघरात पोहचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्नही सुरू आहेत. एकीकडे सभांचा धुरळा तर दुसरीकडे रस्त्यांवरून फिरणारे प्रचार रथांच्या आवाजामुळे निवडणूक प्रचाराची रंगत वाढली आहे. निवडणूक प्रचाराची रंगत वाढत असतानाच त्याचे काऊंटडाऊनही सुरू झाले आहे.
सोमवारी सायंकाळी प्रचार संपणार आहे. त्यामुळे प्रचार सांगताच्या आधी आलेला रविवार सर्वच उमेदवारांनी सार्थकी लावल्याचे दिसून आले. सकाळच्या सत्रात रॅली, दुपारी प्रचार रथ, गाठीभेटी तर सायंकाळी ठाण्यात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचाराच्या तोफा धडाडल्या.