हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांचे प्रतिपादन
ठाणे: देशाचे तुकडे करायची भाषा करणाऱ्याच्या सोबत काँग्रेस आहे. देशाला तोडण्याचे, समाजा-समाजात फूट पाडण्याचे काम काँग्रेसने केले आहे. तेव्हा ‘एक’ राहीलो तरच देश विकासाकडे वाटचाल करणार आहे, असे प्रतिपादन हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी केले.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात आलेल्या मुख्यमंत्री सैनी यांनी मंगळवारी ठाण्यातील भाजप मिडिया सेंटरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे हरियाणा येथील खासदार डॉ. हेमांग जोशी, भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, प्रदेश प्रवक्ते सुजय पत्की, मा. नगरसेविका मृणाल पेंडसे, महामंत्री सचिन पाटील, डॉ. समिरा भारती आदी उपस्थित होते.
हरियाणामध्ये जनतेने तिसर्यांदा भाजपला बहुमत दिले यात गरिबांचा वाटा मोठा आहे. काँग्रेस खोटी आश्वासने देऊन मत विभागणी करते आणि नंतर गरिबांचे शोषण करते हा त्यांचा पूर्वइतिहास आहे. काँग्रेसने हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तेलंगणामध्ये आश्वासने दिली पण त्याची पूर्तता केली नाही. लोकसभा निवडणुकीत देखील काँग्रेसने संविधानाबाबत खोटा प्रचार करून नागरिकांची दिशाभुल केली. काँग्रेस खोटे बोलते… खोटे वायदे करते, काँग्रेसच्या चौथी पिढीचे युवराज यांना संविधानात किती पाने आहेत तेदेखील माहित नाही. लाडकी बहिण योजने विरोधात ते कोर्टात गेले आहेत. पण भाजपने आपल्या संकल्प पत्रात निधी वाढवण्याचा संकल्प केल्याचे मुख्यमंत्री सैनी यांनी सांगितले.
काँग्रेस ओबीसींचा वापर करते आणि ओबीसी समाजाला मोदींनी सन्मान दिल्याने ओबीसी प्रगती करीत आहेत. तेव्हा काँग्रेस बॅकफुटवर असुन महाराष्ट्रातील जनता दुसऱ्यांदा महायुतीला निवडून देणार आणि यांना बाहेरचा रस्ता दाखवणार असल्याचा विश्वास सैनी यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना मुख्यमंत्री सैनी यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक है तो सेफ है चे समर्थन करताना एक राहिलो तरच देश विकासाकडे वाटचाल करणार असल्याचे सांगितले. १९४७ ला पहिल्यांदा काँग्रेसने देशाचे तुकडे केल्याचे सांगितले. हा देश मुस्लिमांचा आहे, अल्पसंख्यांकांचा आहे हे त्यांच्याच पंतप्रधानांनी म्हटले होते, याचे पुरावे उपलब्ध असल्याचे सांगितले. आता भारत जोडोच्या नावाखाली राहूल गांधी, देश कमजोर करणाऱ्यांना सोबत घेतात. देशाचे तुकडे करायची भाषा करणाऱ्याच्या सोबत काँग्रेस आहे. देशाला तोडण्याचे, समाजा समाजात फूट पाडण्याचे काम काँग्रेसने केले आहे. हरियाणात देखील काँग्रेसने जातीयवाद पेरला पण तिथे डाळ शिजली नाही. तेव्हा, महाराष्ट्रातही त्यांच्या राजकिय दुकानदारीला चाप लागून सुपडा साफ होणार असल्याचे भाकीत मुख्यमंत्री सैनी यांनी केले.