ठाण्याचा डीपी प्लॅन बिल्डरांनी तयार केला.
* विकास आराखड्यातून जागा वगळण्यासाठी बिल्डरांकडून वसुली
* जितेंद्र आव्हाड यांचा नावे जाहीर करण्याचा इशारा
ठाणे : नवीन विकास आराखड्यातून जागा वगळण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे नाव सांगून अधिकाऱ्यांनी बिल्डर लॉबीकडून चौरस फुटामागे कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. येत्या २३ तारखेला संबंधितांची नावे जाहीर करणार असल्याचा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
ठाण्याचा नवीन विकास आराखडा नुकताच जाहीर करण्यात आला असून हा विकास आराखडाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या विकास आराखड्यात खारीगांवमध्ये डीपी रस्त्याचे आरक्षण टाकण्यात आले असून यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांची आणि भूमिपुत्रांची घरे उद्ध्वस्त होणार आहेत, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. मुंब्रामध्ये एक प्लॉट असून तेथे स्मशानभूमीचे आरक्षण टाकण्यात आले आहे. मुंब्रा आणि कौसा या भागात मुस्लिम समाजाची लोकसंख्या जास्त आहे. मात्र या भागांमध्ये कोणी हिंदूच नाही, मग स्मशानभूमी कशाला आणली? असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. त्या ठिकाणी स्मशानभूमी आणून ती नंतर हटवायची. सुपारी आधीच कोणीतरी घेतलेली आहे. ही सुपारी कोणी घेतली हे चौथ्या मजल्यावर जाणाऱ्या प्रत्येकाला माहिती आहे. पैशाच्या थैल्या कुठे पोहोचल्या, कोणी घेतले हे सर्व मला माहिती आहे, पण त्याबद्दल मला आता काही बोलायचे नसल्याचे आव्हाड यांनी सांगितले.
खारीगावमधून डीपी रस्ता काढणे म्हणजे खारीगांव उद्ध्वस्त करण्यासारखे आहे, हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावे. ही भूमिका आगरी समाजाच्या विरोधात आहे. व्यायाम शाळा अनधिकृत आहे, हे आयुक्तांना माहीत आहे, पण कोणीच तोडण्याची हिंमत दाखवत नाही. महापालिकेच्या आयुक्तांना एकच विचारणा आहे की त्याला नोटीस दिली असताना आजपर्यंत बांधकाम का तोडण्यात आले नाही? पालिका प्रशासनाचे अधिकारी आणि मंत्रालयात बसलेले अधिकारी एकत्र बसून डीपी प्लॅन बनवतात. हा डीपी प्लॅन कुठे बनवला कसा बनवला याच्या कहाण्याही भलत्याच सुरस आहेत. या आराखड्यातून विशिष्ट जागा वळण्याच्या बदल्यात चौरस फुटामागे पैसे घेतले जातात. यासाठी काही माणसे बाजारात फिरत होती, अशा प्रकरणामुळे मुख्यमंत्री निष्कारण बदनाम होतात. मुख्यमंत्र्यांनी एकही रुपया घेतला नाही, पण या माणसांनी मुख्यमंत्र्यांचे नाव सांगून बिल्डर लॉबीकडून करोडो रुपये घेतले असून ही माणसे कोण आहे हे २३ तारखेला जाहीर करेन, असा इशारा देखील जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.